
सावली
भेटले मी आज
माझ्याच सावलीला….
म्हटले, प्रत्येकवेळी सोबत असते
आज जरा निवांत बोलू
मी थांबले….
तशी सावली पण थबकली
‘Hi ‘ म्हणून मी हात पुढे केला
same तीने पण हात पुढे केला
पण हात हातात येईना
मी म्हटले “offline भेटतोय आपण,
Online सारखी का वागतेस
चुकलं का काही माझं ?”
सावली म्हणाली ” छे ग !
तुला सवय होऊ नये माझी,एवढंच
कोणी कुणाच नसतं या जगात
मी देखील नाही ,
फक्त सोबत राहण्याचं
वरदान आहे मला
पण,बाकी तुझच तुला करायचं हं !”
मी विचारलं ” मग , आता पण आणि नेहमी
कशाला सोबत असतेस?”
ती म्हणाली “आत्मा माहिती आहे तुला !
पण कधी बघितला नाहीस
जरा निरखून बघ मला ,तुला स्वतःला !
जो पर्यंत तू तोपर्यंत मी !”
बोलता बोलता डोळे मिटले
तशी सावलीही नाहीशी झाली
कदाचित
माझ्या पुढच्या प्रवासाची
दिशा ठरवायला ….
सीमा वैद्य
वरोरा, जि. चंद्रपूर
=====