
एक फुल उघडतं..
एक फुल उघडतं
रोज सकाळी.
दिसतो त्याला
पाऊस प्रकाशाचा.
आणि स्फुरते कविता
मग सुगंधाची
मऊ पाकळ्यांवर.
धुंद भुंगा येतो आणि
करतो संग आत्म्याशी.
फुलाच्या इच्छांचे कण
नेतो दुस-या फुलापाशी.
आणि देतो काही इच्छांचे कण
कुणा दुस-या फुलांचे..
भुंगा धुंद
आत्मसंगीतात.
कण बंद
पाकळ्यांच्या कोंदणात.
फुलेही धुंद
फळांच्या बंधनात.
धुंद चव भुंग्याची
मुरते आत्मगोडी फळांत.
विचारांचा भुंगा
नेतो आपल्याला
आपल्या फुलाकडे
आपली कहाणी
सुफळ व्हायला..
एक फुल उघडतं
रोज सकाळी.
इच्छांचे कण
मंदशी गुणगुण
आणि
नेतं आपलं नशिब
विचारांवर होऊन स्वार..
एक फुल उघडतं
रोज सकाळी.
प्रेमाचा वारा
सुटलाय पहा किती छान..
संध्या दीपक देशपांडे
जिल्हा दुर्ग, भिलाई छत्तीसगढ