
७० वर्षात कमावलेली देशाची संपत्ती अदानीला देण्याचा मोदींचा सपाटा; डॉ. नितीन राऊत
_गोंदिया जिल्ह्यातील एलआयसीच्या कार्यालयासमोर आंदोलन_
सुबोध चहांदे, प्रतिनिधी
गोंदिया : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाने ७० वर्षात कमावलेली संपत्ती उद्योगपती मित्र अदानीला देण्याचा सपाटा लावला आहे. एसबीआय ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आणि सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी मधील जनतेचा पैसाही अदानीच्या खिशात घातला. सर्व नियम, कायदे मोडून एखाद्या उद्योगपतीसाठी रान मोकळे करणे हे देशाच्या हिताचे नाही असे विधान आज राज्याचे माजी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी गोंदिया येथील आंदोलनात केले
यावेळी बोलतांना आमचे नेते राहुलजी गांधी यांनी सातत्याने अदानी संदर्भात धोक्याची जाणीव करुन दिली होती. तरीही मोदी सरकार जागे झाले नाही. आता घोटाळा उघड झाला आहे. काँग्रेस पक्षाने या घोटाळ्याची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. मात्र मोदी सरकार चौकशीही करत नाही आणि काही उत्तरही देत नाही, असेही राऊत म्हणाले.
‘अदानी’ समूहातील गैरकारभाराची चौकशी करावी आणि जनतेचा पैसा सुरक्षित रहावा या मागणीसह आज गोंदिया जिल्ह्यातील एलआयसीच्या कार्यालयासमोर राज्याचे माजी ऊर्जामंत्री व कांग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते डॉ. नितीन राऊत यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.
प्रसंगी गोंदिया जिल्हा कांग्रेस समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.