
‘मी आज मानवातला देव पहिला’; प्रशांत ठाकरे
नाशिक: आजपासून म्हणजे शनिवार, रविवार असे दोन दिवस नवीन शिक्षण निती संदर्भात आयोजित वर्कशॉपसाठी मी आमच्या मुख्याध्यापक व इतर मान्यवरांसह नाशिक येथे उपस्थित झालो.
संध्याकाळी गोदाकाठी असलेल्या ‘महाराष्ट्र प्रबोधन सेवा मंडळ’ येथे मुक्काम असल्याने माझे परम मित्र बंधूतुल्य आदरणीय राजेंद्र वाघ सर आणि मी तिथल्या प्रांगणात फिरत असताना, एका साध्या भोळ्या चेहऱ्याची व्यक्ती फाटे तोडून संध्याकाळच्या जेवणासाठी सरपण जमा करताना पाहिले.
चेहऱ्यावरचे निर्विकार भाव टिपण्यात आम्हाला वेळ लागला नाही. सहज जवळ जावून विचारपूस केली. ते प्रकाश राजाराम पवार मुक्काम पोस्ट बाभुळणे तालुका सटाणा जिल्हा नाशिक येथील आदिवासी कुटुंबात जन्माला आलेले कर्मयोगी होते. त्यांचे शिक्षण एम. ए. बी. एड. विषय भूगोल असून शिक्षकाची नोकरी नसल्याने गेल्या चार वर्षांपासून एम पी एस सी च्या तयारीसाठी ते नाशिकला राहत असल्याचे समजले.
अतिशय गरीब कुटुंबात जन्मलेले सर हातात कुऱ्हाड घेवून काटे पेट्या मधून लाकडे जमा करताना पाहिले अन् आमच्या डोळ्यात पण अश्रू तरारले. त्यांच्या जिद्दीला सलाम करावासा वाटला.
दुसऱ्याच क्षणी मनात विचार आला की आपण मध्यम वर्गीय माणसे आपल्या मुलांसाठी किती करतो. लाखो रुपये फी भरून मोठ्या मोठ्या इंग्रजी शाळांमधे दाखल करतो.वरून त्याहीपेक्षा महाग खाजगी क्लास लावतो आपल्या अपेक्षा किती पूर्ण होतील माहित नाही. पण माणूस म्हणून जगताना असा संघर्ष आपल्या मुलांनी केला असता का?? आपण त्यांना करू दिला असता का??
आज समाजातले हे वास्तव चित्र आहे. शिकून नोकरी मिळणे जवळपास कठीण आहे अश्या वेळी गरज आहे ती मुलांना परिस्थितीची जाणीव करून देण्याची.
प्रकाश सरांकडे पाहून एक मात्र नक्की जाणवले, त्यांच्या डोळ्यात आत्मविश्वास होता. आणि मनात उज्वल भविष्याची खात्री होती. देव त्यांना उज्वल यश देवो. त्यांच्या आई वडिलांच्या आयुष्यात प्रकाश येवो. लहान भाऊ बहिण यांच्या स्वप्नांची पूर्ती होवो हीच प्रभू चरणी याचना.
प्रशांत ठाकरे, नाशिक