‘व्हँलेटाईन डे’चे गिफ्ट; वृंदा करमरकर

‘व्हँलेटाईन डे’चे गिफ्ट; वृंदा करमरकर



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

विश्वासराव नेहमीप्रमाणे आज संध्याकाळी फिरायला बाहेर पडले. बागेतील त्यांच्या ठराविक बाकावर बसले आणि खेळणारी मुले, जोडपी येणारे जाणारे यांच्याकडे पाहू लागले. आज तीव्रतेने त्यांना जानकीची आठवण येत होती.
ती गेल्या पासून रोजचा दिवस तिच्या आठवणीतच जायचा.
“आज बरोबर सहा वर्षे झाली. जानकी सोडून गेली मला. लहानशा आजाराचं निमित्त. ताप आला, आठ दिवसात
होत्याचं नव्हतं झालं.तेंव्हा पासून एकेक दिवस युगासारखा वाटतो. “विश्वासरावांनी निग्रहाने डोळ्यांतले पाणी
पुसले. सात वाजून गेले म्हणून, ते बागेतून उठले आणि घरा कडे चालू लागले.

रिझर्व्ह बँकेत आँफिसर, छान पगार, जानकी सारखी देखणी पत्नी. खाऊन पिऊन सुखी कुटुंब. त्यात जानकी एका शाळेत नोकरी करीत होती. अगदी टुकीनं संसार केला त्यांनी. त्यांना दोन मुलं, अभिषेक आणि आभा. आभा पण शिकली एम.ए. पर्यंत आणि मग छानसं स्थळ आलं अनिकेत चं .तो सीए होता. बंगलोरला स्थायिक होता आई वडिलांसह. आभाचं लग्न झालं.अभि तर हुशार होता .तो मेडिकलला गेला, एम एस.झाला. तो प्रख्यात सर्जन झाला. तो दिल्लीला
स्थायिक झाला. त्याची बायको रागी सुध्दा डॉक्टर…. भूलतज्ञ होती. त्याना दोन गोंडस मुलं होती. एकूण सगळं छानच होतं.

विश्वास राव घरी आले. सखूनं देवापुढे दिवा लावला
होता.’ सायेब गरम भात केलाय. कढी आणि पालेभाजी
बी हाय. भाकरी बी केली आहे. ताट करू का?’असं ती अदबीनं विचारत होती. पण ‘अगं तू जा आता. रामा, मुलं
वाट पहात असतील. मी घेईन वाढून नंतर’ असं ते म्हणाले
आणि सखू गेली. सखू आणि राम यांना बंगल्याच्या आऊट हाऊस मध्ये रहायला जागा दिली होती.मुलांची शिक्षणं
झाली आणि त्या नंतर हा बंगला बांधायला घेतला. आधी स्वस्तात बरेच वर्षांपूर्वी प्लाँट घेतला होता. जानकीची
बंगल्याची आवड तिनं एक दोनदा त्यांना बोलून दाखविली होती. साधारण पंधरा वर्षांपूर्वी बांधला हा बंगला.

विश्वासराव बळेबळे चार घास जेवले. आज झोपताना सुध्दा जानकीचे विचार डोक्यात होते. उशीरा झोप लागली. सकाळी जाग आली. ती पक्ष्यांच्या किलबिलाने. उठले, सखूनं त्यांचा आवडता आलं घालून चहा केला. मग नाश्ता तयार करून ती गेली. विश्वासराव यंत्रवत आवरत होते. आजकाल असचं व्हायचं. काही झालं तरी, जानकी आठवायची. बागेतील मोगरा, चाफ्याचा दरवळ, प्राजक्ताची पखरण, एवढेच नाही तर मऊशार हिरवळ. ती चालण्यासाठी तिनं खासकरून घेतली होती. म्हणायची,’चाललं कि पायांना थंडावा मिळतो आणि डोक्याला सुध्दा तापट माणसांच्या’. ‘त्यावेळी तिचं मिस्कील खळीदार हास्य मोहात पाडायचं.’हं…..’विश्वास रावांनी सुस्कारा सोडला.

एवढ्यात त्यांचा फोन वाजला. अभि बोलत होता. आवर्जून वडिलांना घरी बोलवत होता. ते तोंडदेखलं हो म्हणाले. खरं सांगायचं तर त्यांना दिल्लीला चैन पडत नव्हतं. पूर्वी जानकी असताना प्रत्येक क्षण सुखाचाच असायचा. पण. आता…..त्यांनी आवंढा गिळला. आज ते सकाळीच बाजारात गेले. तसे सामान वगैरे रामा सखू आणायचे. हे
सहजच गेले होते. तर बाजार अक्षरशः सजला होता.गिफ्ट्स आकर्षक लाल रंगाचे ड्रेसेस, लाल बदामाच्या आकाराचे फुगे, गुलाब ,जरबेरा, निशिगंध खूप रंगाची फुले पण जास्त
लालच रंग सगळीकडे. एवढ्यात त्यांचं लक्ष तिच्याकडे गेले. सावळी, दिसायला रेखीव अशी ही मध्यमवयीन स्त्री त्यांना फिरायला जाताना दिसायची. केस जरा रुपेरी झाले होते; पण ती हसली कि, खळी पडायची आणि त्यांना
जानकी दिसायची. सारा भासच. एकदा बोलता बोलता कळलं ती वृध्दाश्रमात राहते. तिथे स्वयंपाक करते आणि रहायला फुकट मिळते. बहुधा भाजीसाठी आली असेल.

जानकीच्या तिथीवेळी आभा आलेली असताना ते अन्नदान करायला त्याआश्रमात गेले. त्यानंतर दरवर्षी हमखास
तिथं जानकीच्या तिथीला अन्नदान करायचे. एरवी सुध्दा
काहीतरी निमित्ताने ते तेथे धान्य द्यायचे. ती दिसली कि का कुणास ठाऊक विश्वासराव खुलायचे. …विश्वासराव घरी
आले आणि अचानक बेल वाजली. सखूनं दार उघडलं.
दारात अभिषेक, त्याची पत्नी आणि आभा, अनिकेत उभे. या असं म्हणून सखू ओरडली. विश्वासराव कुतूहलाने पुढे गेले अर्थात त्यांना खूप आनंद झाला.’अरे नातवंडे कुठे आहेत .”बाबा आधी आत तर येऊ द्या’असं म्हणत सारी आत आली. चहापाणी झाल्यावर अभि, आभा म्हणाल ‘बाबा,जरा आलोच . पाऊण तासाने ते आले. तोपर्यंत सुनेने सखूला विचारून ओवाळायची तयारी केली. ते आले. आभा
ओरडली बाबा या ‘विश्वासराव आले आणि आश्चर्यचकित झाले. त्या दोघांबरोबर ती.. वृध्दाश्रमातली….होती. जरा लाजली होती. विश्वासराव गडबडले. एवढ्यात सुनेनं तिचं
औक्षण केलं. ती आत आली, बावरलेली……फिकी गुलाबी साडी, लांबसडक वेणी आणि चेहरा मोहक. ती कोचावर बसली.आभा विश्वासराव ना घेऊन आत गेली. बाबा आता
ऐका हं. आज ‘व्हँलेंटाईन डे’ आहे. ही अनिता, तुमच्यासाठी
सरप्राईज, अहो मागे मी आले, तेंव्हाच माझ्या लक्षात आले. तुम्हाला अनिता आवडते. मी मागेच तिच्याशी बोलले. अभिदादाला सर्व सांगितले. मी आश्रमाच्या फाँरमँलिटिझ पूर्ण केल्या आहेत. आम्ही रितसर मागणी घातली तिला
तुमची बायको म्हणून.” ‘अगं पोरी केवढा कारभार केलात.’मग तुम्ही आमच्याकडे येत नाही. तुम्हाला सुध्दा सुखात जीवन जगायचा हक्क आहे. सरळ रजिस्टर मँरेज करायचं. सगळी प्रोसिजर पूर्ण केलीय आम्ही आणि काही जुजबी सह्या लागतील तुमच्या. बाबा माफ करा. तुमच्या जीवनात आईचे स्थान तसेच राहिल, पण ही अनिता
पण तुम्हाला साथ देईल..’

(दोन महिन्यांनंतर …) आज अखेर तो दिवस आला. विश्वासराव अनिता यांचं रजिस्टर लग्न झालं. साक्षीदार
मुलगा आणि जावई होते. आपल्या बाबांना व्हँलेंटाईन गिफ्ट म्हणून सुखी जीवन दिल्यामुळे आभा आणि अभि खरंच खूप खुश होते.

लेखिका वृंदा(चित्रा)करमरकर
सांगली जिल्हा सांगली
========

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,877FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles