
डे.. डे… आणि डेचं….!!;अनिता व्यवहारे
‘मी कशाला आरशात पाहू गं, मीच माझ्या रुपाची राणी गं’. माझ्या मोठ्या दीदीची नववीच्या वर्गात शिकत असलेली तनुजा हे गाणं गुणगुणत तीन-तीनदा आरशात पाहत होती. स्वतःशीच हसत, बोलत होती.हातात एक छोटासा आरसा पाठीमागे, पुढे धरून मोकळ्या केसांना उडवताना म्हणत होती, ‘ही चाल तुरुतुरु उडती केस भुरुभुरु’ आज तिने माझ्या आजीची फडताळातली रियल पैठणी घातली होती. तिचा पदर हातात धरून पुन्हा दुसरं गाणं, ‘पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा’. आजीला वाटत होतं, आज तिने आपली साडी घातली आहे, म्हणून एवढे नखरे चालू असावेत. तर आईला वाटत होतं आज गाणे डे. असेल… मला आणि माझ्या दादाला मात्र माहीत होतं आज साडी डे आहे, म्हणून तिचे नखरे चाललेत. तेवढ्यात आई बोलली आणि हो असले गाणे नको म्हणू. एखादं भावगीत म्हण.
केशवा माधवा…सारखं.! तसं तनूच्या हातातला कंगवा पडला. दादा आणि मी जोरजोरात हसू लागलो.. आणि ती दचकली.. आणि म्हणाली, ‘आई आज काही गाणे गा डे नाही काय’? साडी डे..आहे.
साडी डे? आजी एकदम चकित झाली. अग हे काय नवीनच साडी डे, चॉकलेट डे, तसं दादा म्हणाला अगं आजी आता ‘रोज डे’ आहेत. आजीला काही समजेना! तसं मी म्हटलं, ‘दादा रोज डे’ आत्ताच नाही. तो म्हणाला, अरे ‘रोज डे’ म्हणजे रोज वेगवेगळे डे डे डे आणि डेचं. मग त्यांनी आजीला समजावून सांगितलं. आता आजी पुन्हा आश्चर्यचकित झाली. म्हणाली, अरे हे काय !आमच्या काळात ही हे डे होते. वसंत पंचमी, रथसप्तमी, दुर्गा अष्टमी, नवमी, एकादशी शिवाय प्रत्येक दिवसाचे महत्त्व वेगळेच. अगदी सण वार पूजाअर्चा सगळं काही साग्रसंगीत. त्यासाठी वेगवेगळे पदार्थही केले जायचे. सर्वजण एकत्र मिळून जेवण करणं वगैरे. अन् तुम्ही काय करता या दिवसांना….? दादा आणि आजीच्यात आता चांगलीच जुगलबंदी रंगली. तो म्हणाला, ‘हे बघ आजी हा फेब्रुवारी महिना म्हणजे प्रेमाचा महिना’.
14 तारीख ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणजे अखंड प्रेमाचा दिवस.. संपलं. आजी, आई आवाक होऊन दादा कडे पाहत होत्या. आणि मी मात्र तथास्तु ! इतका वेळ आश्चर्याने ऐकून घेण्याऱ्या आजीच्या रागाचा पारा चढला.ती आमच्या आईला म्हणाली, अगं हे काय, रखमा, असं वळण लावलं का ग माझ्या नातवांना. कुठे लाज, लज्जा, शरम…..!! काही संस्कार केलेस की नाही ह्याच्यावर. आई बिचारी काय बोलणार? दादाच्या अंगात काय भूत संचारलं होतं प्रेमाचं हेच तिला कळेना. ! आजीच्या तोंडाची टकळी चालू होती. आई मात्र एकदम शांत. मी ही आता निशब्द झाले. आजीचा राग आला. आईची कीव आली. आणि दादा आणि तनुजा कडे बघून विचारात पडले..
खरंच !काय ना ही आजच्या पिढीची स्टाईल. आजपर्यंत कधीही मी असा विचार केला नव्हता, पण आज वाटू लागलं, खरच! किती भयानक ना हे सारं.. प्रेमाचे दिवस…. त्यातून तो रोमान्स… मग पळून जाणं… लग्न…!! आणि एकमेकांची ओळख पटल्यानंतर घटस्फोट किंवा एक तर्फी प्रेम. त्यातून गैरसमज…… एखादी अमृता देशपांडे किंवा आर्ची परशा .. म्हणजे ही दोन टोकं बांधली जातात. आणि दोन्ही चा शेवट वाईटच.. निदान व्हॅलेंटाईन डे’ ला पार्श्वभूमी तरी आहे. पण फ्रेंडस डे, फ्रेंडशिप डे, रोज डे, काय अर्थ याला… कुठेतरी संस्कृती जपायची नाटकं म्हणून….. मदर्स डे… फादर्स डे.. पण मला वाटतं हे तरी साजरे करायची काय गरज? जिथे आपल्या संस्कृतीत ‘मातृ देवो भव पितृ देवो भव’ मानलं आहे.
‘जितकं गिफ्ट महागडं तितक प्रेम तगडं’. आमच्या वेळी नव्हतं असं प्रेम..प्रेम कशात असतं असं जर कोणी विचारलं तर मी म्हणेल, प्रेम त्यागात असतं प्रेम मनात असतं ते स्वप्नात दिसतं. ते कळतं डोळ्यातल्या भावावरून, पत्रातल्या अक्षरावरून. प्रेम दिवसांमध्ये साजर नाही करायचं तर ते भावनेत भरायचं असतं. अर्थात या नव्या पिढीला ही प्रेमाची व्याख्या ना रुचणारी न पचणारी आहे. दिखाऊ प्रेम करणारे ते फक्त एवढेच म्हणतात ‘प्यार किया तो डरना क्या’? पण आमच्या काळी प्रेम छुपाऊं होतं. पण ते आयुष्यभर असायच आणि आम्ही म्हणायचो,’प्यार करनेवाले प्यार करते है शान से’ आणि ‘ढाई अक्षर प्रेम के’ आयुष्यभर करायचे.. असो पण तुमच्या या प्रेमाच्या सप्ताहाला आमच्याही खूप शुभेच्छा आमच्या सारखं प्रेम करून तर पहा.. मग वाटेल, अ हा!!! आणि म्हणाल, ‘प्रेमा काय देऊ मी तुला भाग्य दिले तू मला’.
अनिता व्यवहारे
ता श्रीरामपूर, जि.अहमदनगर
========