
‘….अन् चांदण्याची रातही व्हायची प्रेमाची साक्षीदार..!’; स्वाती मराडे
आज त्याची खूप शोधाशोध चाललेली. पण पाहिजे असलेला महत्वाचा कागद सापडतच नव्हता. कपाटाचा आतला कप्पा उघडला नि हाती एक डायरी आली. ती डायरी पाहताच त्याच्या मनाचाही आतला कप्पा अलगद उघडला. जणू ती डायरी मनाचा कप्पा उघडण्याची चावीच होती. हळुवार हात फिरवून त्याने पान उलगडले अन् दिसल्या सुरेख अक्षरातील काही ओळी.. खास त्याच्यासाठी लिहिलेल्या.. हो रे लख्ख आठवतं मला.. आपण सोबत भटकायचो, गप्पा मारायचो.. पण जे सांगायचे होते ते कधी ओठांवर आलेच नाही.. आजही ते ओठांवर येत नाही.. ते केवळ नजरेनेच टिपले. मग ते तू लिहून काढले नि पोहचवले माझ्यापर्यंत.. तुझं माझ्यावर प्रेम आहे.. हे सांगायची तुझी नजर.. तू हृदयापासून घातली साद नि मीही उत्तर म्हणून दिलेली ही डायरी.. तुझ्या नि माझ्या प्रेमाची साक्षीदार..!
रेशीमगाठी बांधल्या नि तुझ्या घराला केव्हाच आपलंसं केलं.. पण तरीही कधी लज्जेची बंधनं झुगारुन तुझ्या ओठातून प्रेम बाहेर पडलेच नाही. पण कधी कधी बाजारात गेलेली पावलं परतताना हातात गजरा घेऊन यायची.. पण सगळ्यांसमोर न देता तू तो गुपचूप आणून ठेवायचा आपल्या खोलीत.. सगळी कामं आवरून मी तिथे येईपर्यंत सगळीकडे गंध भरून रहायचा.. जणू प्रीतगंधच श्वासात दरवळायचा..!
शब्दांपेक्षाही बोलायची ती तुझी नजर.. धीर देणारी, कौतुक करणारी.. कौतुकरूपी प्रेमच ते . ब-याच वेळा माझ्याकडून चुकाही व्हायच्या.. कामाचा ताण येऊन आदळआपटही व्हायची.. सगळंच तू सावरून घ्यायचास. मला विसावायला कधीही तुझा खांदा तयार असायचा..विश्वासाचा खांदा, विश्वासरूपी प्रेमच ते.. पाहिलंय रे मी, मी कुठे बाहेर गेले अन् येताना उशीर झाला तर वाटेकडे लागलेले तुझे डोळे अन् मनाची घालमेल.. मी कधी आजारी पडले तर तुझ्या शब्दातली व स्पर्शातील काळजी.. मी वेळेवर खावं प्यावं म्हणून तुझी होणारी कुरकूर.. ते कौतुक, तो विश्वास, ती काळजी, ती घालमेल अन् ती कुरकूरही आहेच ना तुझ्या प्रेमाची साक्षीदार..!
माहित आहे मला
माझं तुझ्यावर प्रेम आहे
असं तू कधीच नाही म्हणणार
पण तुझी प्रत्येक कृती
तुझं माझ्यावरील प्रेमाची
जणू आहे साक्षीदार..!
आजच्या काळात प्रेम व्यक्त करण्यासाठी विशिष्ट दिवस असतात अन् मोठ्या उत्साहाने ते साजरेही केले जातात. पण एक काळ असा होता की प्रेम शब्दांवीणही व्यक्त व्हायचं.. हृदयाच्या स्पंदनातून ते जाणवायचं.. नजरेतून बोलायचं.. आपुलकीच्या स्पर्शातून कळायचं.. त्याग, समर्पण, विश्वास, काळजी यांच्या रूपात तो ‘प्रेम’ हा अडीच अक्षरी शब्द विखुरलेला असायचा. कधी तो एखादा गुलाब, कधी कधी मोरपीस, प्रिय व्यक्तीसाठीची कविता, एखादी पाऊलवाट, नदीवरचा घाट, रम्य सागरकिनारा, सोनेरी सांज अन् चांदण्याची रातही व्हायची प्रेमाची साक्षीदार..!
आज चित्र चारोळी स्पर्धेसाठी आलेले चित्र.. ओंजळीत विसावलेले हृदयचित्र.. जणू तुझ्या प्रेमळ हृदयस्पंदनामुळे माझ्या आयुष्याची ओंजळ भरून गेली.. असेच सांगत होते. ही स्पंदने नक्कीच आहेत ‘प्रेमाची साक्षीदार’.. मनात प्रेम फुलवणारी ही भावना.. मुळात प्रेम ही भावनाच माणसाला अंतर्बाह्य बदलून टाकते त्यामुळेच ती लेखणीलाही भुरळ घालते. हृदयाशी शब्दांतून नाते जुळवत व्यक्त होण्याचा सर्वांनीच अतिशय सुरेख प्रयत्न केला. अंतर्मनातून भावनांना घातलेली साद नेहमीच भावते. ही साद ऐका आणि लिहा.. लिहीत रहा व्यक्त व्हा या शुभेच्छांसह सर्व सहभागी रचनाकारांचे हार्दिक अभिनंदन. 💐
आदरणीय राहुल दादांनी मला परीक्षण लेखणीची संंधी दिली त्यांचे हृदयस्थ आभार 🙏
स्वाती मराडे,पुणे
मुख्य परीक्षक कवयित्री लेखिका