
‘घराला घरपण देणारी ती..!!’;स्वाती मराडे-आटोळे
पैंजण घालून रुणझुण वाजवत घरभर दुडूदुडू धावणारे तिचे पाय.! थोडी मोठी झाली, की शाळेच्या स्नेहसंमलनात नृत्यासाठी जेव्हा बाई नाव घेतात, तेव्हा मात्र ती मनात असूनही नकार देते. का तर.. वडिलांना आवडत नाही असं नाचलेलं. वर्गशिक्षिका कशाबशा तिच्या आजीला सांगून तिच्या वडिलांची परवानगी मिळवतात अन् तिच्या चेहऱ्यावर हसू फुलवतात. बस तेवढे एकच वर्ष तिला असे नृत्याचा आनंद घ्यायला मिळते. त्यानंतर तिचे ते पैंजण जणू कायमचे मूक होऊन जातात. गाणं म्हणायला आवडायचं तिला. गुणगुणत राहायची नेहमीच आणि हट्ट करायची गाणे शिकण्यासाठी. पण आई मात्र दटावायची. आपल्यात नाही हो कुणी असे गाणे म्हणत. काय मिळणार त्यातून? त्यापेक्षा स्वयंपाक शिक चांगला. सासरी नाव तरी निघेल आमचे आणि गाणे बिणे शिकायचं असेल तर लग्न झाल्यावर काय करायचे ते करा. आवाजच दबला तिचा, आता कोणतीच धून तिला गुणगुणावी वाटत नाही.
खूप अभ्यास करायची ती वर्गात नेहमी पहिल्या तीन मध्ये, पण उच्च शिक्षणाची वेळ येते; तेव्हा वडील म्हणतात मी फक्त एकाच्याच शिक्षणाचा खर्च भागवू शकतो. ती डोळ्यातला अश्रू लपवून अभ्यासात जेमतेम असणाऱ्या आपल्या भावाला पुढे शिकवा असे हसत मुखाने सांगते. मोठी स्वप्न पहायचं ती आता बंदच करते. यथावकाश होऊन जातं तिचं लग्न अन् गुरफटून जाते संसाराच्या रहाट गाडग्यात. एक काम उपसले की दुसरे तयारच. चक्र अविरत सुरू.! पै पाहुणे, चूल मूल कितीही नाही म्हटलं; तर कधी चुकलेच नाही तिला. आता तर तिला हेही आठवत नाही तिला कोणते छंद होते ते. मनाच्या एका कप्प्यात कोंडून ठेवल्यासारखे…!
बघता बघता चाळीशी येते. आता मात्र तिने बराच पल्ला गाठलेला असतो. घरात तिचं वेगळं स्थान निर्माण झालेलं असतं. अन् मग तिलाही हळू हळू जाणीव होते तिच्या अस्तित्वाची.! नदी सागरात मिसळली तरी, जेव्हा ती वाफ होऊन बाहेर येते तेव्हा स्व अस्तित्व घेऊनच. तशीच काहीशी ती असते. आता तिला आठवतात तिचे छंद, ती खुलवत राहते त्यांना आणि त्यातून स्वतःलाही.. पुन्हा हरवलेले सारे क्षण ती जगू पाहते. अंधारल्या वाटेवर. दिप आशेचा पेटवते.. वात होऊनी जळत राहते. तिच्या मनातील हा दिप आपण सर्वांनीच नित्य तेवत ठेवूया..! तिच्या इच्छा आकांक्षाना, छंदांना नवे बळ देऊया. आजी, आई, बहीण, मुलगी, पत्नी.. आपल्या घरातील ही पंचारती नित्य तेजोमय ठेवूया.. हीच महिला दिनानिमित्त अपेक्षा. अशा या तेजोमय पणती घरोघर आहेत, म्हणूनच त्या घराचा गाभारा तेजाने उजळून निघतो.चैतन्य विलसते.. अन् घरात ती असेल, तर घराला घरपण येते..!!
स्वाती मराडे-आटोळे
इंदापूर, पुणे
=======