
‘ऐलाईट क्लासिक’ शरीरसौष्ठव स्पर्धेचे ५ वे सत्र थाटात संपन्न
नागपूर जिल्हा प्रतिनिधी
नागपूर – ‘ऐलाईट क्लासिक’ या राष्ट्रीय स्तराच्या शरीरसौष्ठव स्पर्धेच्या ५ वे सत्र काल रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहात पार पडले. या स्पर्धेत सहभाग घेण्याकरिता स्पर्धक आसाम, कोलकाता, दिल्ली, पंजाब या शहरांसह विदर्भातील अनेक शहरातून नागपूर शहरात दाखल झाले होते. क्लासिक फिजिक, मेन्स फिजिक, आणि फिटनेस मॉडेल सारख्या गटांत झालेल्या या स्पर्धेत परीक्षक म्हणून फिटनेस क्षेत्रात अनेक वर्षांपासून कार्यरत असणारे मोहसीन खान (कोलकाता), इम्रान खान (दिल्ली), साहेब सिद्धीकी (कानपूर), कांतिश हाडके (नागपूर), सुनिल शेरॉन (दिल्ली), किशन तिवारी (नागपूर), अनिरुद्ध तंवर (दिल्ली) हे प्रामुख्याने उपस्थित होते. तर फिटनेस युटयूबर निपुण अग्रवाल, मुंबई मनसेचे कार्याध्यक्ष संकेत कुलकर्णी, नागपूर पोलीस दलातील पोलीस निरीक्षक अनिल ताकसांडे, सोनेगव विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक बागूल, सीबॉयसीस कॉलेजचे विभागप्रमुख सुखबिंदर सिंह ही विशेष उपस्थित होते.
१०० पेक्षा अधिक स्पर्धक विविध शहरातून या स्पर्धेत सहभागी झाले होते. दुपारपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत स्पर्धकांनी विविध श्रेणींतून आपल्या कला परीक्षकांसमोर सादर केल्या. ओवरऑल क्लासिक फिजिक आणि मेन्स फिजिक या दोन्ही श्रेणीत विजयी झालेल्या मुंबईच्या यातिशला एकूण १ लाख रुपये रोख, स्मृतीचिन्ह व मेडल देवून सन्मानित करण्यात आले. तसेच एका वर्षासाठी एकूण २ लाख रुपयांचे प्रायोजकत्व ही ऐलाईट क्लासिक’ तर्फे देण्यात आलेले आहे. फिटनेस मॉडेलच्या श्रेणीत नागपूरचा जय पाटील हा विजयी ठरला त्यालासुद्धा या स्पर्धेच्या मंचावर गौरविण्यात आले.
या कार्यक्रमात समाजातील व रस्त्यावरील लोकांना नेहमी वैदकीय मदत करणाऱ्या संदीप मोटघरे या युवकाचा ही विशेष सन्मान हा आयोजकांतर्फे करण्यात आला. तर एका समूहाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित एका समूहनृत्याची ही प्रस्तुती प्रेक्षकांसमोर केली. या कार्यक्रमास यशस्वी करण्याकरिता ऐलाईट क्लासिक या स्पर्धेचे संस्थापक व मुख्य आयोजक बादल शर्मा व हॉऊस ऑफ फिटनेस जीमचे संचालक अतुल टिकले यांच्यासह त्यांचे सहकारी अफाक खान, हाश्मीत चौधरी, निखिल गौलकर, संकेत बुग्गेवार, जावेद खान, मुफिस मिर्झा यांनी विशेष परिश्रम घेतले. तर या कार्यक्रमाची सूत्रसंचालनाची सूत्रे अल्फिया शेख, आणि राहुल तरार यांनी सांभाळली.