
गृहिणीची विद्यार्थीदशा
दिवाळीच्या अभ्यासाला म्हणून मी माहेरी आले. तर, तिथे माझ्या आधीच खंडीभर पाहुणे उतरलेले. आता अभ्यासाचे तीन-तेरा होणार हे मला समजले. मी पुन्हा माझ्या सासरी निघून आले. इथेही पाहुणे पाहून तर मला रडूच कोसळले. आता कसा अभ्यास करणार? परीक्षेत काय लिहिणार जीव अगदी मेटाकुटीला आला. कामानं शरीर अगदी थकून गेलेलं. रात्री एक, दोन पानं वाचली असतील, नसतील तोच निद्रादेवीने वाकुल्या दाखवून कुशीत बोलावून घेतलं..
अर्थात..ही माझ्या एकटीच अवस्था का? तर नाही! लग्न झाल्यानंतर शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक गृहिणीची ही व्यथा. घरकामाचा गाडा ओढता ओढता ती थकून जाते. पतिराजांची सरबराई करा, कारण त्यांना ऑफिसला जायचे असते ना?..घरातील व्यक्तींचे, मुलाबाळांचे करता करता वेळ कुठे आणि कसा जातो तेही तिला समजत नाही. बरं त्यानंतर अभ्यास करावा तर..घर कसा चकाचक असावं ही सर्वांची अपेक्षा! ती पूर्ण करताना स्वतःकडे,अभ्यासाकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. जरी कोणत्याही कलेची आवड असली; तरी सवड नसल्यामुळे ती लोप पावत चालते. संसार म्हटलं की तडजोड आलीच.. पण ती तरी कुठवर करायची आणि नेमकी स्त्रीनंचं का? ती करताना तिच्या आयुष्याला तडाच जातो.. ती विजोड होते पण याचे कुणाला काहीच वाटत नाही.तिला इतर मुलींप्रमाणे हसावं, खिदळावंसं वाटतं.पण गळ्यातील काळ्या धाग्याने तिच्यावर बंधन रेखाच पडते, तो बंधन रेखेचा लगाम तिला मागे खेचतो.
पण ध्येय साध्य करण्यासाठी कितीही खाचखळगे आले तरी, ती पार करते.अत्युच्च शिखर जरी गाठता आलं नाही, तरी जाण्यासाठी प्रयत्न करत असते. क्वचित एखादीला हा प्रवास अर्धवट सोडून ही द्यावा लागतो.त्यावेळी तिच्या यातनांना अंत नसतो. पण म्हणून ती मागे राहत नाही, तर उलट त्यातून मार्ग काढत पुरूषाच्या खांद्याला खांदा लावून त्याच्याही पुढे एक पाऊल टाकून वाटचाल करते. म्हणून तिला सांगावसं वाटतं की,
हे नारी करू नकोस कष्टाची खंत
कधीतरी येईल तुझ्या जीवनात वसंत
जाईल सरुनी हा उन्हाळा येईल पुन्हा
सरसरूनी पुन्हा पावसाळा
कर पेरणी यशाची
येथील पिके सुखाची….
अनिता व्यवहारे
ता श्रीरामपूर जि अहमदनगर
======