
अस्तित्व
अस्तित्व देवाचे आहे की, नाही याचा कायम आपल्याला संभ्रम पडतो. पण हे देवाचे अस्तित्व आहे. हे प्रत्येकाने ओळखले पाहिजे. देव या जगात आहे. आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. कसा ते या कथेतून आपण पहा. राघवचे, राधिका त्याच्या दोन मुली, मुलगा सर्व मिळून शेगावला गजानन महाराजांच्या दर्शनासाठी जातात. मुंबईवरून पहाटे गाडीमध्ये बसतात. शेगावी पोहोचेपर्यंत दुपार होते. तिथे आश्रम शाळेमध्ये आपल्या राहण्याची व्यवस्था करतात. सामान तिथे ठेवतात, आवरतात व दर्शनासाठी देवळात जातात.
भूक लागलेली असते. आश्रमा बाहेरच एक शेगाव कचोरी स्पेशल आणि वडापाव, भजी यांची गाडी लागलेली असते. तिथे राघव चे कुटुंब नाश्त्यासाठी उभे राहते. तेवढ्यात एक अजागळ बाई, जिचे केस विंचरलेले नव्हते. साडी फाटलेली होती. जवळजवळ चार-पाच दिवस आंघोळ केलेली नसावी. अशी एक बाई राधिका समोर येऊन उभी राहिली. राघव व राधिकाने त्या बाईला पाहिले. त्या अजागळ बाईने राधिकाच्या डोक्यावरून हात फिरवला. अंगावरून हात फिरवला. राधिकाला जरा कसनुसे झाले. राधिकाच्या बांगड्या पाहून म्हणाली ” खूप छान दिसतेस, सुखी होशील बाळा तू ”
हे ऐकताच राघव राधिकाने विचारले तुम्हाला काय हवे नाश्त्याला? ती बाई म्हणाली” एक वडापाव द्या ” राघवने वडापाव घेतला आणि त्याबाईला दिला. पैसे देऊन तिच्याकडे पाहिले. पण काय आश्चर्य! अवघ्या मिनिटात ती बाई दिसेनाशी झाली. खूप आश्चर्य वाटले. त्या दोघांनी त्या बाई बद्दल आजूबाजूला चौकशी केली. पण तिच्याबद्दल कोणालाही कल्पना नव्हती. दोघानी आश्चर्यचकित होऊनच नाष्टा केला व दर्शन घ्यायला समाधीवर गेले. रांगेत उभे राहिले. महाप्रसादाकडे सर्वजण गेले.
राघवच्या कुटुंबाचा नंबर आला आणि महाप्रसाद देणे बंद झाले. त्यांनी सांगितले उद्या दुपारी बारा वाजता या लाईन मध्ये उभे रहा. खरंतर त्यांना परतीचा प्रवास रात्रीच करायचा होता. पण महाप्रसाद घ्यायचा असल्यानं राघव तिथे एक दिवस मुक्कामी थांबला. संध्याकाळच्या वेळी तेथील आनंदसागर बाग, शेगाव परिसर पाहिला. पहाटे उठून आवरून परत देवाला जाऊन दोघेही पाया पडले.
बरोबर बाराच्या आत महाप्रसादाच्या रांगेत उभे राहिले. बरोबर 12 वाजून पाच मिनिटांनी महाप्रसाद देणे सुरू झाले. राघवच्या फॅमिली चा पहिलाच नंबर. राधिकाला पहिले बोलवण्यात आले. तिच्याबरोबर आणखी चार सौभाग्यवतीना बोलवण्यात आले. तेथील ब्राह्मणाने त्यांच्या पायावर पाणी टाकले. हळदी कुंकू वाहिले.महाप्रसादालयात नेले. पहिला घास घेण्याचा मान त्यादिवशी मिळाला. नंतर भरभर ओळीमध्ये लोकांना सोडण्यात आले व महाप्रसाद सुरू झाला. इथे देवाचे अस्तित्व शंभर टक्के जाणवते. राघव राधिकाला प्रथम मी आहे हा साक्षात्कार दिला. नंतर सौभाग्यवती चा मानही दिला.
( कथा प्रत्यक्ष घडलेली आहे. पात्रांची नावे बदललेली आहेत.)
वसुधा नाईक,पुणे