
श्री राम महिमा
लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रम रघुवंशनाथम।
कारुण्य रूपं करुणाकरं श्रीरामचंद्र शरणं प्रपद्ये॥
.
चैत्रातील नवमीला प्रभू रामचंद्रांनी अवतार घेतला. ‘जय श्रीराम’ हे दोन अक्षरी शब्द. पण प्रत्येकाच्या जीवनात नवसंजीवनी देणारा महान मंत्र ठरला. वाल्या कोळ्याचा, महर्षी वाल्मिकी याच दोन अक्षराने घडला. वाल्मिकींना अगाध शक्ती या मंत्रातून प्राप्त झाली. याच बळावर रामायण घडले. सत्यम् शिवम् सुंदरम्’ असणाऱ्या भारतीय संस्कृतीच्या भक्तिभावात रामायण-महाभारत दोन ग्रंथ श्रेष्ठ ठरले. महाभारत सांगून जाते सार जगी जगण्याचे..नि रामायण शिकवते संस्कार आदर्श जीवनाचे. अगदी परदेशातही हे संस्कार जाऊन पोहोचले आहेत. राम, लक्ष्मण,सीता यांच्या कथा संपूर्ण जनतेला ज्ञात आहेत तशा सातासमुद्रापलीकडे जय श्रीराम घराघरात पोहोचला आहे. राम, सीता आणि लक्ष्मण यांच्याबरोबर लंकाधिपती रावण असो, वा रामभक्त विभीषन असो, वा रामदास महाबली हनुमान असो, साऱ्या जगती ते श्रेष्ठ ठरले आहेत. रामायण हे संपूर्ण मानवजातीसाठी संस्कारांचं कोठार आहे. जगातील श्रेष्ठ कुटुंब संस्कार व नात्यांची गुंफण हे रामायणात पाहायला मिळते.
एक आदर्श राजा,आज्ञाधारक पुत्र,कर्तव्यनिष्ठ बंधू व प्रेमळ सखा..अशा प्रत्येक भूमिकेतून श्रीरामाने एक वेगळा आदर्श घालून दिला. एक पत्नी एक वचनी असलेल्या प्रभू रामचंद्रांविषयी नुकतीच मी एक कथा ऐकली. रामनवमीच्या दिवशी प्रभू रामाने अवतार घेतला त्यावेळी दिव्य, लोभसवाण्या या बालकाला पाहायला सर्व देव देवता स्वर्गातून खाली अवतरले.सूर्यनारायण देखील प्रभू रामाच्या दर्शनाला आले. प्रभूंचे ते रूप पाहून सूर्यनारायणाचे समाधान होईना ते त्या दिव्यत्वाकडे पाहातच राहिले, जागेवरून ते हलेनात.मग झाली पंचाईत.ते गेल्याशिवाय चंद्राला हे रूप पाहायला येता येत नव्हते. त्यामुळे विनवण्या करून ते थकले आणि दुःखी होऊन बसले ,शेवटी ते प्रभू रामाकडे गेले, प्रभूनेही खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ. सूर्यनारायणाने त्यांचेही ऐकले नाही.शितल चंद्र शांत राहिला शेवटी रामाने त्यांना आजपासून माझ्या नावापुढे तुझे नाव लावले जाईल.असा वरदान दिला.म्हणून ते ‘रामचंद्र’ झाले. पुढच्या जन्मी सगळ्यात आधी मी तुला दर्शन देईल असे सांगितले.तेव्हा चंद्राचे समाधान झाले.अशी आख्यायिका. अन् असे हे आपले महादैवत ‘श्री प्रभू रामचंद्र.’ .
रामनवमीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा
अनिता व्यवहारे
ता श्रीरामपूर जि. अहमदनगर