
भूक
पोट पाठीला लागलेलं
घामाच्या थेंबानं चेहरा धुवून निघालेला
कळकट मळकट
फाटका सदरा घातलेला
निस्तेज चेहरा
पाठीवर ओझं पेलवतं
आयुष्याचा तोल सांभाळत
म्हातारपणानं बरबटलेलं आयुष्य
थरथरत्या हातानं सावरतं
आधाराची काठी शोधण्यात
चाचपडणारं मन….
स्वत:च्या अस्तित्त्वाची
भूक घेऊन तो जगत होता
पोरानं जबाबदारी झटकताच
लटपटणारे हात
ओझं पेलण्यात व्यस्त
पुढ्यात होती फक्त भूक…
ओझं उतरविल्यानंतर
धाप टाकत पाण्याचे घोट घेवून
पोट भरल्याचं समाधान मानणारा..
रस्त्याच्या कडेला
हाताने पायाने अधू असलेल्या
भिका-यांच्या गर्दीशी
स्वत:ची तुलना करत
स्वत:ला धन्य मानणारा
केवळ प्रेमाच्या,ममतेच्या
भूकेच्या शोधात
आजही आसुसलेल्या
नजरा शोधत फिरतात
प्रेमाची हाक ऐकण्यासाठी
अधीर झालेले कान..
‘जग शून्यात विसावले की
आपले जगणे शून्य’
या प्रश्नातच अडकलेलं मन
सगळीकडे दिसते
ती फक्त भूक आणि भूक…
डॉ.सौ.मंजूषा साखरकर
ब्रह्मपुरी जि.चंद्रपूर
========