
मनाला विध्द करणाऱ्या ‘अंधारखुणा’; वृंदा करमरकर
खरंच मानवी जीवन हे सुखदुःखाच्या धाग्यांनी विणलेले आहे. ‘एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे, जरतारी हे वस्त्र मानवा तुझिया आयुष्याचे’ हे ‘जगाच्या पाठीवर’ या मराठी चित्रपटातील ग.दि.माडगूळकर या श्रेष्ठ कवींच्या लेखणीतून साकारलेल्या गीतात जीवनाचे यथार्थ वर्णन केले आहे. तर जीवन हे असे आहे. याचे रंग अनेक. काही लोभसवाणे तर, काही उदासवाणे. सांज क्षितीजावरील रंग हे आपल्या मनाचे प्रतिबिंब असते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. “जीवनाचा सारिपाट,सुखदुःख सोंगट्यांचा”. खरच या जीवन रुपी खेळात जसा डाव आपल्या वाट्याला येईल तसा स्वीकारून तो खेळणे भाग पडते. ज्याच्या त्याच्या प्रारब्धा नुसार जीवन वाट्याला येते.
‘आयुष्य’ म्हणजे सुख दुःखाचा खेळ आहे. मात्र माणूस सुखाचे क्षण लगेच विसरतो आणि दुःख आयुष्यभर कुरवाळत बसतो. यशाच्या शिखरावर चढताना अपयशाची एखादी पायरी येणारच. पण याचा अर्थ त्या पायरीवरच रेंगाळत बसायचं असा होत नाही. अपयश आल्यावर तो आयुष्याचा एक भाग आहे असं समजून पुन्हा नव्याने प्रयत्न करत राहायचे. कारण अपयशाच्या पाठोपाठ यश तुम्हाला नव्याने भेटण्यासाठी सज्ज झालेलं असतं. अशावेळी निराश मनाला गरज असते ती प्रेरणादायी विचारांची, आशावादाची… सुखामागून दुःख पण दुःखामागून सुख येतेच. सुख पाहता जवापडे,दुःख पर्वताएवढे” असे वचन संत रामदासांनी सांगितले आहे. पण दुःखा मागून सुख येतेच असेही संत वचन आहे.
आपल्या मनाविरुद्ध काही घडले, एखादी घटना घडली तर; माणूस दुःखी होतो. साहजिकच आहे हे. पण एखाद्या गोष्टीत मिळालेल्या अपयशाने जीवन अंधाराने झाकोळून गेले तरी प्रयत्नांची कास धरली, मनी आशेची ज्योत तेवत ठेवली, तर मार्ग प्रकाशाने उजळून जाईल. शेवटी मानवी मनाला आशेच्या किरणांची जी देणगी मिळाले ली आहे ती अत्यंत अमूल्य. प्रेमात आलेले अपयश, फसवणूक, नात्यांमधील दुरावा, पतीपत्नीतील विसंवाद आर्थिक संकटे अशी एक ना अनेक दुःखाची कारणे असतात. त्यावेळी एखाद्या जवळच्या व्यक्तीजवळ मन मोकळे करणे,मनात सकारात्मक विचार आणणे हिताचे ठरते.
पण जेंव्हा असे अनुभव येतात, ज्यांच्यावर अपार विश्वास ठेवला तेच उलटले. पाठीमागून वार करु लागले तर किती दुःख होईल. त्यावेळी मनावर होणारे घाव दिसतील का कोणा? या कृष्ण कृत्याच्या “अंधारखुणा” लपवण्यासाठी केला जाणारा खोटेपणा, बेबनाव हा मनाला जास्त विध्द करतो.”अंधारखुणा”हा आपल्या आदरणीय राहुल सरांनी दिलेला विषय बहु आयामी आहे. एक म्हणजे आपली आपल्याच माणसांनी केलेली फसवणूक आणि ते कृत्य झाकण्याचा प्रयत्न वेदना दायक आहे. जीवनात आधीच अनेक आव्हाने माणसाला झेलावी लागतात. त्यासाठी मनाला तयार करावे लागते पण जेंव्हा आपलेच दुखाव तात तेंव्हा काय?हा खरंच यक्षप्रश्न आहे. आपल्याला सर्वांना विचार करायला भाग पाडणाऱ्या या ‘अंधार खुणा’ खरंच जीवघेण्या आहेत.”काटा रुते कुणाला, आक्रंदतात कोणी, मज फुलही रुतावे हा दैवयोग आहे’ असंच याबाबत म्हणावे वाटते. खरंच या ‘अंधारखुणा’ कधीच जीवनात वाट्याला येऊ नयेत असेच वाटते.
सौ.वृंदा(चित्रा)करमरकर
सांगली जिल्हाः सांगली.
परीक्षक,लेखिका, कवयित्री
©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह.