
‘सुखदुःखाची ही बॅलन्स शीटच जणू’; प्रा. तारका रूखमोडे
*_शुक्रवारीय हायकू काव्य परीक्षण_*
मार्च एंडिंगचे वारे लागताच वाहू..वर्षभराच्या खर्चाचे व मिळकतीच्या लेखाजोख्याचं गणित होते सुरू..कर्ज..कपात..यांचा ताळेबंद मांडताना कर्मचाऱ्यांची दमछाक होते सुरू..जमाखर्चाचा हा ताळमेळ साधतानाचं..आ.राहुलसरांनी दिलेलं हे मर्मचित्र म्हणजे कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या मानवाच्या मार्च एंडीगच्या कसरतीची..पर्यायी सुखदुःखाची ही बॅलन्स शीटच जणू!!!
खरंय नं!.रात्रंदिन अभ्यासश्रमाने, प्रसंगी पैसा खर्च करून उच्च शिक्षण घ्यायचं,नंतर नोकरीसाठी वणवण..सरकारी मिळाली तर ठीक नाहीतर खाजगी नोकरीसाठी पुन्हा पैसा..नोकरी करताना कर्ज कटेपर्यंत स्वआयुष्याच्या जमाखर्चाचा हिशोबाचा ताळमेळ साधावा लागतो.ऑफिसच्या जमाखर्चाचा काटेकोरपणे हिशोब ठेवावा लागतो..सारीच दमछाक..शेवटी उरतो डोक्यावर कर्जाचा ओझाच व अस्वस्थता..
नोकरी क्षेत्रातील ही अस्वस्थता मानवी आयुष्याच्या परिप्रेक्ष्यातही थेट शिरणारी..आयुष्याचंही असंच असतं..आजच्या विश्वात जन्म घ्यायचा म्हणजे कर्ज पाचवीलाच पुजलेलं..जीवनाच्या ऐलतीरी आपली स्वप्ने जमा करता करता तारूण्य खर्च होतं..व सुखाचे स्वप्न सत्यात उतरताना या व्यवहारी जगात अर्ध आयुष्य खर्ची झालेलं असतं.. पैलतीर गाठेस्तोवर हा कर्जाचा ओझा पाठीवर घेऊन माणसाला दरवर्षी मार्च एंडीगला हा खर्चरूपी सुखदुःखाचा लेखाजोखा पडताळावा लागतो.या हिशोबात दुःखाचंच पारडं जड झालेलं असतं.
आज मार्च एंडिंगचं औचित्य साधून.. अगदी सत्यस्थितीचे..बेहिशोबी आयुष्याचे शब्दरूपात चोख हिशोब मांडण्यासाठी आ. राहुल सरांनी हे सरत्या मार्चच्या जमाखर्चाच्या लेखाजोख्याचं व ते करत असताना होणाऱ्या कर्जरूपी दमछाकीचं चित्र दिलेलं..सर्वांनी आपापल्या प्रतिभाशक्तीने छान हृदयस्पर्शी रचना केल्यात, बऱ्याच रचना चिंतन व अंतर्मुख करायला लावणाऱ्या..तेव्हा सर्वांचं अभिनंदन .💐💐असेच लिहिते व्हा ✍️
थोडसं मनातलं–
आपलं जीवन मोलाचं असतं.. आयुष्यातील सुखदुःखाचा ताळमेळ साधत,नातीगोती सांभाळत,एकमेकांच्या भावना जपत, सुखदुःखाचा तोल सांभाळत..आपणास आपला जमाखर्च मांडता यायला हवा..चला तर दुःखाचं कर्ज उणे होऊन सुखाची बेरीज व्हावी एवढं आयुष्याचं सुरेख गणित मांडूया.. आ.राहुल सरांनी मला परीक्षण लेखनाची संधी दिली त्याबद्दल त्यांचे हृदयस्त आभार🙏🙏
प्रा तारका रूखमोडे, गोंदिया
परीक्षक,कवयित्री,लेखिका, सहप्रशासक