
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कार्यशाळा संपन्न
_वनाझ परिवार विद्या मंदिराचा उपक्रम_
अमृता खाकुर्डीकर, पुणे प्रतिनिधी
पुणे: केंद्र सरकारने नुकतेच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर केले असून येत्या काळात सध्या प्रस्थापित असलेला शिक्षणव्यवस्थेचा ढाँचा संपूर्ण बदलून नाविन्यपूर्ण रचना नव्या धोरणात प्रस्तावित करण्यात आली आहे. याबाबत सर्वत्र मतमतांतरे आणि उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. केंद्र सरकारलाही या विषयात विविध शिक्षण संस्थांमध्ये चर्चा करून तज्ञांनी विचारमंथन घडवून आपले मत मांडणे अपेक्षित आहे. म्हणूनच विविध शैक्षणिक संस्थांमध्ये याबाबत चर्चा कार्यक्रम घेण्यात येत आहेत. याच अनुषंगाने ‘वनाझ परिवार विद्या मंदिर,कोथरूड ‘ या संस्थेने एका मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन केले होते.
संस्थेच्या शालेय ईमारतीमध्ये आयोजित या कार्यशाळेस पुण्यातील विविध शाळातून 150 शिक्षक सहभागी झाले होते. प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले शिक्षणतज्ञ डॉ. अ. ल. देशमुख व श्रीमती प्राची चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा संपन्न झाली. ‘रोटरी क्लब ऑफ विस्डम’ यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नव्या धोरणानुसार बालवाडी वर्गाचा सुध्दा औपचारिक शिक्षण पध्दतीत समावेश करण्यात आला असून पूर्व प्राथमिक विभागात ख-या अर्थांना मुलाचा मेंदूचा विकास होत असतो, हे ध्यानी घेऊन नवीन शैक्षणिक धोरणात पूर्व प्राथमिक विभागाच्या शिक्षणावर अधिकाधिक भर दिला आहे.
या धोरणा नुसार प्रस्तावित अभ्यासक्रम कसा असणार आहे, त्याचे टप्पे व परीक्षा पध्दती यांचा आराखडा कसा असेल, विद्यार्थ्याचे कोणते कौशल्य कोणत्या वयोगटात विकसित होणे अपेक्षित आहे, त्याचप्रमाणे ई.9 वी ते 12वी या परीक्षा सेमिस्टर पद्धती नुसार कशा घेतल्या जातील, याबाबतचे सविस्तर विवेचन करून नवीन शैक्षणिक धोरण प्रत्येक पालकांपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता डॉ. अ. ल. देशमुख यांनी प्रतिपादन केली, तर डॉ. प्राची चौधरी यांनी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून शिक्षण प्रभावी करण्याचे तंत्र सोदाहरण समजावून सांगितले.
यावेळी संस्थेच्या अध्यक्षा दातेबाई यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ.शीतल देशमुख, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. अनिता दारवटकर आणि माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ.वृषाली वाशिमकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. रोटरी क्लबच्या अध्यक्षा , वैशाली वारणेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. माया झावरे यांनी प्रास्ताविकातून कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला. विविध संस्थेच्या वतीने कार्यशाळेत सक्रीय सहभागी झालेल्या शिक्षकांना मान्यवरांचे हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना जाधव यांनी केले. हेमा भरेकर यांनी आभार मानले.
कार्यक्रमासाठी वनाझ शाळेचे सचिव मा. श्री.वाय.के .कदम आणि खजिनदार मा. श्री.विनोद सकपाळ तसेच सर्व विभागातील शिक्षक आणि इतर शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात शिक्षक प्रतिनिधींच्या शंकांचे निरसन करण्यात आले.