नव्हतच माझ्या बापाचं

नव्हतच माझ्या बापाचं काही….. बिचारा राब राब राबला….आयुष्यभर. त्याला तोलामोलाची साथ देणारी माझी माय कधी उपवाशी तर कधी अर्धपोटी झोपायची. स्वाभिमानाने जगले दोघे, भले घरात चूल नसेल पेटली पण कधीच कुणापुढे हात नाही पसरायचे हे पथ्य त्यांनी सारं आयुष्य न चुकता पाळले. झोपडी वजा घर ते, कधीकधी चिमणीच्या घासलेटचीही बिपत असायची आमची….तेव्हा बाकी दुःख काय सांगावं..?पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नादारी तर पाचवीलाच पुजलेली,दुष्काळ, निसर्गाचा कोप, यात बिघा दीड-बिघा जमीन कधी सावकाराने गिळंकृत केली कळूही दिलं नाही बापुड्यांना…. वरून कर्जाचे घेणे अजून पण आहेच, कधी कधी मारतो तो फेरफटका कर्ज वसुलीसाठी, लहानपणापासून गरिबीचे चटके,भुकेची थंडी आणि दारिद्र्याचा पाऊस सारं काही अनुभवलय मी. घरात मी मोठा होतो,माझ्या पाठची बहीण तिच्या बिचारीच्या नशिबात तर शाळा पण नव्हती…
आम्हा तिघांमध्ये लहान होता तो.. आधीपासून जरा चंचलच… आज त्याचं बस्तान चांगल्यापैकी बसलय, पण विसरला तो आम्हाला….असू द्या ना
नशिबाचे भोग..बाकी काय?

आठवते ती काळरात्र… आई गेली…कायमची आम्हाला सोडून… ती बिचारी गरिबीच्या ओझ्यात इतकी वाकली होती की आजारातून उठलीच नाही, अर्थात तिला उठवायचे कष्टही कोणी घेतले नाहीत. आईच्या जाण्याने बापाचा जणू कणाच मोडला तोही जास्त काळ नाही जगला,आम्हाला तिघांना पोरके करून दोघे गेलेत तेव्हा मी असेल पंधरा वर्षाचा..अन् बहीण बारा वर्षांची…. आई झाली ती बिचारी माझी तेव्हापासून… तिच्या कोवळ्या हातांना भाकरीचे चटके बसले,भाजली गेली ती कायमची बाहेरून आणि आतूनही….

लहान भावाला शिकण्यासाठी एका अनाथालयात जिल्ह्याला पाठवलं.आम्ही दोघेही पुरवत गेलो त्याला जे लागते ते… पण तो गेला तसा तिकडचा झाला कधीच पुन्हा आला नाही माघारी आणि आता येईल याची आशा पण सोडली आम्ही.

मी मिळेल ते काम करत गेलो …कोणाचं सरपन आणणे,कुणाची धूनी,कुणाची ओझी, कुणाच्या शेतातलं काम…..लाज नाही वाटली कारण भ्रांत असायची ती संध्याकाळची आणि त्या निरागस बहिणीच्या पोटाची….कारण पुष्कळदा एक भाकरी आम्ही अर्धी अर्धी करून पाण्यासोबत खाल्ली पण आनंदाने…

आई-वडिलांचा एक वारसा आम्ही दोघांनीही जोपासला तो म्हणजे स्वाभिमान कधीच विकला नाही भले उपाशी झोपलो पण कधीच कुणापुढे हात नाही पसरला. थोडाफार पैसा जमला की पोस्टात जाऊन लहान भावाला मनी ऑर्डर करायचं त्या रात्री शांत झोप लागायची आम्हा दोघांनाही ज्यांनी आपल्या आयुष्यात कधी आनंद नाही पाहिला त्या आई-वडिलांना किमान स्वर्गात तरी आनंद मिळत असेल माझे व बहिणीचे कर्तव्य पाहून अशा विचाराने.

काल परवा आक्रीत घडलं.. सावकाराचा माणूस काहीतरी कागद घेऊन आला.. आम्हाला कुठे कळतंय काय ते? क्षणात झोपेतून सामान रस्त्यावर आले अनाथ तर होतोच आम्ही आता तो म्हणत होता की ही पण जागा ताबे गहाण होती त्याने कब्जा केला त्या जागेवर..

दुसरं काही नको हो आम्हाला…..कुणी घर देता का घर…. आम्हा दोघांचीही आर्त हाक पोहोचेल का तुम्हा सर्वांपर्यंत???? की अनाथ म्हणून उघड्यावरच मरण येईल आम्हाला… समजा आलं तरी आमच्या त्या लहानग्याला नका हो बोलवू आमच्या अंत्यसंस्कार साठी…

मनात विचार आला नटसम्राट अप्पासाहेब बेलवणकरांवर आलेली वेळ आम्हावर पण आली आहे….
जगावं की मरावं एकच सवाल आहे या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगाव बेशरम लाचार आनंदाने ???का फेकून द्याव देहाचे लखतर मृत्यूच्या काळासार डोहामधे??? आणि करावा शेवट सर्वांचा एकाच प्रहाराने?? माझा तुझा याचा आणि त्याचाही….

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles