
*मोहर.*
उमटली मोहर तुझी
मज हृदयसिंहासनी…
साठवून ठेवले मी रे
तूजला मम नयनी…
बंद पापण्या आड तू
खेळ तुझ्याशी रंगतो…
तूच कृष्णसखा मज
साखरमिठीत राहतो…
उमटली मोहर जीवनी
फुलला तूच प्राजक्त…
शब्द शब्द गुंफोनीया
होत असते मी व्यक्त…
मन उचंबळते माझे
होते लाटेवर मी स्वार..
मोहर तू बकुळीचा या
गुंफतोस केसात हार…
दिन सुखाचे लाभले
वदन फुलले आनंदे…
गेला जळून हा विरह
घेतलेस कवे तू स्वानंदे…
वृंदावनी शाम गोवळा
सूर काढतसे बासरी..
साधीभोळी मी रे मीरा
हसरी बुजरी लाजरी…
राहू दे ही हृदयी मोहर
ठेव जपून तू रे निरंतर…
कधी ना येवू दे तू
आपल्यात सख्या अंतर…
ओसंडे मम हृदयी
तुज प्रेमाची निर्झरिणी
नाही दिसलास तू की
हृदय गाते मज विराणी….
*✍सौ.सविता पाटील ठाकरे.*
*सिल्वासा*
*दादरा नगर हवेली.*
*©सहप्रशासक/संकलक मराठीचे शिलेदार समूह.*