
‘दोघांचीही घुसमट म्हणजे… एकजीवपणा’; प्रा तारका रूखमोडे
_शुक्रवारीय हायकू काव्यपरीक्षण_
तो– हश्श! किती वाट पाहत होतो
या क्षणाची
ती– मी जाऊ का निघून..
तो– छे गं! तसा विचार सुद्धा मनात
आणू नकोस..
ती– तुझे खरंच प्रेम आहे माझ्यावर.
तो– अर्थातच..
ती– तू कधी माझी फसवणूक तर
नाही ना केलेली …
तो– नो…नेव्हर!! असा विचार तरी
तुझ्या मनात कसा येतो ..
ती– तू माझ्यावरचा अखंड प्रेम
करशील ?
तो– हो तर..
ती– तू मला मारहाण करशील?
तो– नाही! अजिबात नाही..
ती– मी तुझ्यावर विश्वास ठेवू शकते
का ?
तो– हो..
हे दोघांचे संवाद लग्नापूर्वीचे..किती छान वाटतात ना वाचायला!!..पण लग्नानंतर नव्याची नवलाई संपल्यानंतर वर्षभराच्या आतच हेच संवाद खालून वर वाचा..(उलट) सहज एकदा माझ्या वाचनात हा विनोद गेलेला.पतीपत्नीच्या नात्यावरं प्रकाश टाकणारा किती सोपा विनोद..पण उलट वाचताच किती गांभीर्य ना त्यात!!
खरंच.. असंच असतं बरेच अंशी हल्लीच्या स्त्री-पुरूष नात्यांचं.. संसाराचा डाव मांडताना.. ‘मनासारखा मिळे सवंगडी..खेळाया मग अवीट गोडी’ हे ध्यानात ठेवून मनासारखा जोडीदार मिळवण्याचा प्रयत्न केला जातो,तो मिळतोही..सुरू होते सहजीवन..सहजीवनात मग सुरूवातीचे उमेदीचे दिवस अगदी गोड वाटतात..पण मग यासोबतच कौटुंबिक जबाबदाऱ्या येतात,सध्याचा काळातील अनेक आर्थिक आव्हाने,,पुरुषांच्या बदलत्या भूमिका,फास्ट लाईफ,करिअरला प्राधान्य,बदलत्या नोकऱ्या, लैंगिक समस्या,एकमेकांना वेळ न देणं..यामुळे निखळ संवादाला पारखे होऊन विसंवाद वाढतो.कधी तर मूकसंवादामुळे परत संशयबीज मनी घर करू लागतं.. प्राप्त परिस्थिती बदलत जाते, स्वभावाचे कंगोरे टोचायला लागतात..वाद सुरू होतात.. आकर्षण कमी व्हायला लागतं..
अशा अनेक कारणांनी नात्यातील ओढ कमी व्हायला लागते..मनात रंगवलेले स्वप्न व बांधलेले आराखडे पूर्ण होत नाहीत..मानसिक, शारीरिक, भावनिक आधाराची ,विश्वासाची कमतरता भासायला लागते.. दोघांचीही घुसमट सुरू होते..नि लग्न या नात्यात उरते केवळ चिडचिड, धुसफूस,वैताग..
वादावादीतून मनस्ताप..
संशय मनी
कुटुंबाची ही हानी
डोळ्यात पाणी
विजय शिर्के सरांचं काव्य दिसायला साधं पण संसारनात्यातील सारगर्भता सांगणारं..कित्येक नातं संशयामुळेही संपुष्टाच्या तीरी उभं असलेलं.. शब्दांचे जीवघेणे अर्थ काढणारं.. त्यामुळे आपल्याच नात्यात आपण होतो परकं..सोबत असूनही एकटेपणाचा उरतो भाव..हाच तर माणसाचा स्वभाव.जीवन सहवासाच्या नागमोडी वाटेवर चालताना आंकुचलेल्या नात्यांच्या परिघात जेव्हा भाव बंदिस्त होतो..तेव्हा त्याचं रुपांतर फारकतीत होतं..नि कायद्याच्या चौकटीपर्यंत जातं..
मनात झालेल्या स्फोटाचं पर्यवसान घटस्फ़ोटात होतं.. पण कोर्टातर्फेही कायद्यानं फारकत घेण्याआधी पतीपत्नीत शक्यतो समेट घडवून आणण्यासाठी एकत्रित राहण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी दिला जातो..कारण लग्न एक पवित्र प्रेमाचं बंधन असतं..न्यायव्यवस्थेलाही वाटतं नातं टिकावं..म्हणूनच समंजस्याने पवित्र मानलेलं विवाहनाते धोक्यात घालण्याऐवजी भौतिक सुखाचा व अहंकाराचा त्याग करून..नाती फुलवण्याकडे भर द्यावा..
नाती टिकवण्याची जबाबदारी दोघांचीही असते, पण जेव्हा नात्यात गाठी तयार होतात त्या सामंजस्याने अनेकदा सरगाठी सुटतातही पण निरगाठी असतातच व त्याच सोडवायला कायद्याने सोय केलेली…फारकत की भावनांच्या लहरींनी भूतकाळाच्या जखमा पुसल्या गेल्या तर एकत्र नांदायला मोकळं होणं.. त्याचंच अर्थमय चित्र आ.राहुल सरांनी आज हायकूत दिलेलं…चित्राचं भावार्थ नेमकेपणाने शोधून काढण्यासाठी व त्यावर आपल्या लेखणीची मोहर उमटवून न्याय देण्यासाठी कदाचित आ.सरांनी चित्र दिलेलं…त्याला सर्वांच्या प्रतिभाशक्तीने न्याय दिलेला..सर्वांचे खूप खूप अभिनंदन..असेच लिहिते व्हा..💐💐
आ.राहुल सरांनी मला हायकू काव्यपरीक्षण लेखणाची संधी दिली त्याबद्दल हृदयस्त ॠणानुभार 🙏🙏
प्रा तारका रूखमोडे, गोंदिया
मुख्य परीक्षक सहप्रशासक संकलक