
मनकवडा
असे बाप माझा थोर
साऱ्या घराचा आधार
त्यांच्या सान्निध्यात होई
स्वप्न आमचे साकार||१||
बाप घरात असता
येई घरपण घरा
त्यांच्या असण्याने कसा
येई आनंद हा खरा||२||
आई घराची सावली
बाप झेली सारा भार
सोसूनिया कष्ट सारे
देई घरास आकार||३||
करी काळजी सर्वांची
कधी खचलाच नाही
लेकरांच्या भविष्याचे
सारे कष्ट असे वाही||४||
बाप गंभीर मनाचा
काट्यामध्ये फूल जसे
कसा असला तरीही
माझ्या मनामध्ये वसे||५||
त्यांचा सहवास जणू
असे मायेची सावली
आम्हा लेकरांना अशी
विठू माउली लाभली||६||
कसा वर्णवू शब्दात
घेई बिनचूक ठाव
मनकवडा म्हणती
जाणे मनातले भाव||७||
विनायक कृष्णराव पाटील
बेळगाव, कर्नाटक
=