
मदमस्त तू तारका
काजव्याची रात ही
अंधारास क्षणभर उजळी
मंद सुगंधीत हा वारा
मनास माझ्या मोहवी
हास्य चौफेर तू उधळता
चुकतो काळजाचा ठोका
पुन्हा पुन्हा नजर वैरी
मनास कितीही रोखा
नको पाहणे काजव्यास
प्रकटती अन् लुप्त होती
तू रहा सदैव सखी
स्वयंप्रकाशी आकाशी
मन ठेव स्थिर तुझे
काजव्याची स्पर्धा वेडी
तुझ्या प्रकाशावर जळती
म्हणून त्याची ती खोडी
नाही ग जमली कधी
स्पर्धा त्याला दिव्याशीही
ना आली गाठता कधी
आसमंती तुझी उंची
दुसऱ्याची बरोबरी करणे
समाजाची रीत आहे
काजवा का मग अपराधी
तूच त्याची प्रित आहे
दुरून घे तू आनंद मोठा
निसर्गाची तू मेनका
ह्रदयात कोरलेली साऱ्या
मदमस्त तू तारका
शर्मिला देशमुख -घुमरे, बीड
======