
महाराष्ट्र माझा
आज 1 मे ‘महाराष्ट्र दिन’ तसेच कामगार दिन. महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…! ‘माझ्या मराठी मातीचा श्वास, मराठी बोलीचा. माझ्या महाराष्ट्राचा अवघा मुलुख इंद्रायणीच्या चालीचा.’ माझ्या मायभूमीच्या कटीला धार मराठी तेजाची, कीर्ती सांगतो महाराष्ट्र माझा छत्रपती शिवाजी राजांची. अशा या महाराष्ट्रात जन्मलेले आपण सर्वजण या महाराष्ट्राचा अभिमान बाळगत आहोत. कारण संत तुकाराम महाराज म्हणतात की, माझा महाराष्ट्र सशक्त आहे आणि आम्ही त्याचे भक्त आहोत. तिच्या रक्षणासाठी देह आम्ही झिजवू. अशी संतांची भूमी, ही वीरांची भूमी, निसर्ग सौंदर्याने नटलेली भूमी लाभलेल्या या महाराष्ट्राच्या जन्मोजन्मी जन्मा यावे पोटी मराठी मातीचा गंध शरीरास लाभो नित्य या महाराष्ट्र भूमीचा.
1मे1960 रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली. म्हणून ‘महाराष्ट्र दिन’ तर 1मे याच दिवशी जगाच्या विकासात कामगारांच्या योगदानाला सलाम करण्यासाठी ‘एक मे’ हा कामगार दिन साजरा केला जातो. महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी हा दिवस अगदी खासच असतो. ज्या महाराष्ट्राच्या पराक्रमी वीरांच्या मानवतेच्या व समतेच्या अभिमानातून महान ठरलेल्या या महाराष्ट्रात आम्हा शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांसाठी आजचा दिवस अगदी वेगळाच असतो. सूर्योदयापासूनच, खुलून जाणारं ते शाळेचे प्रांगण, सकाळच्या प्रसन्न वातावरणात मानवंदना देत फडकत राहणारा तो ध्वज, त्यानंतर किलबिल करत निकालासाठी उत्सुक असलेले विद्यार्थ्यांचे ते आनंदी चेहरे हे सगळे आठवते.
प्रत्येक विद्यार्थी आजच्या दिवशी आनंदी असतो. त्यांनी वर्षभर केलेल्या मेहनतीचे फळ त्याला मिळालेलं असतं. त्यामुळे, त्याच्या चेहऱ्यावर झळकणारा तो आनंद, शाळेच्या प्रांगणात हातातील प्रगतीपुस्तक उंचावत बागडणारे ते शूरवीर पाहिल्यावर समाधानाने प्रफुल्लीत होणारे आम्ही शिक्षक, मुलांना त्यांच्या बालवयात अभ्यास करा, पाठांतर करा, शिस्तीने वागा, असे एक ना अनेक अन्याय आम्ही त्यांच्यावर करतो असे वाटत राहणारे हे विद्यार्थी, आज मात्र आनंदाने आमच्याकडे पाहतात, आमच्याकडे पेढ्याचा बॉक्स घेऊन ” घ्या ना मॅडम, घ्या ना सर” असे म्हणत आग्रही होतात. तेव्हा त्या पेढ्यातील गोडीपेक्षा त्यांच्या चेहऱ्यावर झळकणार प्रेम, आपुलकी आम्हाला वर्षभराचा आनंद देऊन जातो. आणि आपोआपच या हृदयीचे त्या हृदयी, ‘विजयी भव’, “सुखी भव” असे आशीर्वाद मनातून बाहेर पडतात. कारण, महाराष्ट्राची महानता इतकी श्रेष्ठ आहे कि, काळालाही जिंकून घेतील इथले प्रज्ञावान, असा माझा महाराष्ट्र आहे महान.
अनिता व्यवहारे
ता. श्रीरामपूर जि अहमदनगर
==========