‘आदर्श’ नेमके कशाला म्हणायचे?

‘आदर्श’ नेमके कशाला म्हणायचे?पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नुकतेच माझ्या यजमानांना एक नामांकित डॉक्टर भेटलेत, सांगत होते..सर कसे आहात तुम्ही ? तब्येत कशी आहे आता? अहो कसलं टेन्शन घेतात? आपले कुटुंब तर किती आदर्शवत. आपल्या कुटुंबाबाबत रोज एकदा तरी आमच्या घरात विषय होतोच. आपण व आपल्या सौभाग्यवती म्हणजे सर्वांसाठी एक आदर्शच. डॉक्टर साहेबांसोबतचे बोलणे जेव्हा आमचे ‘हे’ मला सांगत होते तेव्हा अभिमानाने उर भरून आला. आदर्श..आदर्श म्हणजे नेमकं काय हो? हे तर आम्हालाही ठाऊक नाही. नेमकी आदर्शाची व्याख्या काय? आणि आदर्श कशाला म्हणायचे? पण थंडी व ऊब, दिवस व रात्र, राग व प्रेम, दया व क्षमा, कष्ट व सोशिकता, बस..याच मार्गाने जीवनक्रम चालतो आमचा. हसत खेळत, रडत पडत ‘आलिया भोगासी असावे सादर’ या उक्तीप्रमाणे हजर राहायचं.

आयुष्यात ना अहंकार मनाला शिवला, ना कुणाचा द्वेष, दुस्वास करता आला. हृदय स्फटिकाप्रमाणं निर्मळ. फक्त आणि फक्त हृदयात घरटं बांधायचं हेच आमचं ध्येय. कितीतरी वेळा नियती व निसर्गाने आगळे वेगळे तांडव केले मग हुंदक्यातले कढ आवरत धाय मोकलून रडायचे आणि पुढे जायचे जीवनगाणे गात गात. देवाच्या या विशाल भूमीवर एकाच वेळी अनेक प्रयोग चाललेले असतात, पण आपत्तीतही स्वाभिमान न सोडता, त्यागानं सारं काही टिकवलं. संयम व समाधान त्याला कर्मकुशलतेची जोड देऊन उभारलेला संसार आमचा. कोणतेही काम हीन नसते हे आमच्या रोमरोमात भिनलेले. अनेकदा आकाशात भरारी घेताना अडथळ्यांमुळे पंख तुटले; पण हार न मानता त्यातही समाधान मानत आलो. कारण, ‘आनंदाचा संबंध यश किंवा संपत्तीशी नसतो’, याची प्रचिती अनेकदा आलीय आम्हांला.

निराशेचे काळे ढग का कायम राहतात? सर्व गोष्टी मनासारख्या नाही होत. आपणच आपले रक्षक बनायचं , मनस्थिती व मानसिकता कणखर बनवायची. आकाशात शेकडो ढग येतात, हजारो वारे सुटतात, धुळीचे लोट उठतात, पाखरे उडतात. परंतु या सर्वांच्या पाठीमागे आकाश तर निळेच असते ना? त्या आकाशाला का या गोष्टींचा स्पर्श होतो?मग बस आपले हृदयाकाशही असेच ठेवायचे. कितीही प्रश्न निर्माण होवू देत. समस्या येऊ देत कधीच गोंधळलो नाहीत आम्ही. मन शांत व एकाग्र करत देवाजवळ बसायचं, रित व्हायचं, देवाचाच हात आपल्या सर्वांगावरून फिरवून घ्यायचा. खूप श्रद्धा माझी तर देवावर. कारण, तोच एकमेव असा आहे की खऱ्या खोट्याचा साक्षीदार व नीपक्षपातीपणानं निर्णय देणारा.

चिखल असो वा काटे हातात हात घेत, दगड धोंडे दूर करत, झुळझुळ वाहत जायचे झऱ्यागत. हृदयातील भाव गंगेचं गुणगुणनं ऐकत, धडपड करीत, वणवे विझवत, स्नेह प्रेमाच्या लाटा उसळत उत्साहसागर निर्माण करत वाटचाल आमची. कशाला हवा बडेजाव व मोठेपणा? आपण काय आहोत, ‘आदर्श’ काय असतो? हे लोकांना जाऊन सांगण्यापेक्षा ते आपल्या वर्तनातून सिद्ध झाले याची आम्हाला प्रचिती आली. कारण चंदन असल्याची घोषणा चंदनाला स्वतः करावी लागत नाही; त्याचा सुगंध वाऱ्यासोबत सर्वत्र पसरतो.

मोर धुंद होऊन नाचतो
म्हणून आपण का सुन्न व्हायचं?
कोकिळा सुंदर गाते
म्हणून आपण का खिन्न व्हायचं ?
तुलना करत बसायचं नसतं..
प्रत्येकाचं वेगळेपण असतं..
आणि तेच जपायचं असतं..
आणि तेच जपायचं असतं..

सविता पाटील ठाकरे
सिलवासा,दादरा नगर हवेली.
कार्यकारी संपादक ‘साहित्यगंध’
========

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles