
कवी ग्रेस यांच्या स्मृतिदिनानिमित्त ‘डोहछाया’
केशरी सांज सावळी होताना
कवीचं काळीज कातर होऊन जाई
अंधाररात्र धूसर काळी होताना
आकाशीचं गुज अंगावर ओढून घेई
सारी खिडक्यादारे होताच बंदिस्त..
फटीतून फुटे फिकट पिवळी तिरीप
किर्र काळोख्या अनाम स्थळी अस्वस्थ
लोंबणारा कंदील खिडकीवर चिडीचिप
पान-पान हाललं रानात कुठे सुदूर …
कवीच्या हृदयी हळूच दाटे गहिवर…
रिमझिम पाऊस निनादत कुठे दूरदूर
कवीच्या नयनी दर्द फुटे खोलवर
स्वप्न काजळमाया पसरे क्षितिजावर
अंतरीच्या अंगणी फडफडे एक पक्षी ..
सांध्य पडछाया हळू उतरे धरणीवर
आत्म्याच्या आत आकारते एक नक्षी ..
मिणमिण दिव्यांना कवेत घेऊन
दिव्य निरांजन सांजवेळी उजळते..
झुळझुळ झऱ्यांना सोबत देऊन
भग्न मन त्याचे अवेळी पाझरते …
सोडून कुणी निघाले जेव्हां निष्ठूरपणे
डोळ्यांना धार लागली झरझर …
मोडून कुणी घरटे विस्कटले दुष्टपणे
पापणीच्या काठांतून पाझरली सर..
विजेचा कडकडाट गडद काळरात्र
काळ्याशार छायेत बधीरली गात्र
विलक्षण अलवार मनी मोह माया
क्षणक्षण हळूवार कणकण डोह छाया
©️अमृता खाकुर्डीकर, पुणे