
‘सांजवेळ ..अनंत आठवणींचे मखमली मोरपीस’; संग्राम कुमठेकर
_बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेचे परीक्षण_
सांजलळा कधीच लागला नाही असा एखादा माणूस कितीही शोधला तरी सापडेल का ? नाही ना…मग या सांजवेळेचा प्रत्येकाला एवढा लळा का लागत असेल बरं ? …यावर कितीही लिहिलं तरी अपुरेच आहे…कारण ही सांजवेळ आहेच तशी….प्रत्येकाला ओढ लावणारी…प्रत्येकाचे मन वेधणारी…घराची ओढ लावणारी वेळ म्हणजेच सांजवेळ…कुणाला बायकोची,कुणाला आईची,कुणाला बहिणीची,कुणाला आजीची,कुणाला आजोबाची,कुणाला वडिलाची,कुणाला मुलाची,कुणाला मुलीची ओढ लागलेली आपण पाहिली असेलच…परंतू काहींना मुक्या जनावरांची ओढ पण लागलेली असते.माझ्या लहानपणी माझे बाबा कुठं गावाला जर गेलेले असतील तर आल्याबरोबर जनावरांना चारापाणी केलंय का म्हणून विचारणार आणि हो केलंय…दिवसभरात तीन वेळा केलंय म्हटलं तरी अगोदर जाऊन स्वतः पाणी पाजणार व चारा टाकणार मगच स्वतः पोटाला खाणार…अशीच ओढ जनावरांनाही असतेच ना म्हणूनच “हंबरून वासराले चाटते जव्हा गाय, तव्हा मले तिच्यामध्ये दिसते मही माय ” किती हृदयस्पर्शी व उत्कट प्रेमाची अनुभूती देणाऱ्या या ओळी आहेत.
सांजवेळ…सांजवेळ म्हणजे तरी काय ? तर सांजवेळ म्हणजे सायंकाळ…सायंकाळ म्हणजे ती वेळ जेव्हा सूर्य मावळतो नि रात्र सुरू होते..यालाच काहीजण दिवेलागणीची वेळ असेही म्हणतात.अशी ही सांजवेळ दिवसभर काबाडकष्ट करणाऱ्या, कष्टकरी जीवाला घरी जाण्याची ओढ लावते.आपल्या बाळाला पाळण्यात झोपवून शेतात जाणाऱ्या आईला तर कधी एकदाची घरी जाईन व बाळाला डोळे भरून पाहीन हा विचार करता करताच त्या आईला पान्हा फुटतो व फुटलेला पान्हा बाळाला अगदी पोटभर ती पाजते नि झोपवते आणि हे सुख,हे प्रेम शब्दांत मांडणे अशक्यच ना…
झाल्या तिन्ही सांजा,
करून शिणगार साजा
वाट पाहते मी गं,
येणार साजन माझा
आईची बाळाला भेटण्याची,पाजण्याची जशी ओढ दिसते तशीच सांजवेळ होताच कारूण्यरूपी हृदयकमळात स्थान दिलेल्या आपल्या प्रियकरास,सजनास भेटण्याची,डोळे भरून पाहण्याची ओढ प्रियेसीला,सजनीला लागलेली असते.तप्त झालेल्या धरणीची जशी मृगसरीत चिंब न्हाऊन निघण्याची व्याकुळता शिगेला पोहचलेली असते तशीच सूर्य जसाजसा मावळतीकडे कलतो नि इकडं घरी जाण्याची ओढ सर्वांना व्याकुळ करीत असते.
काल परवा “प्रेम काय असतं” हा विषय आला होता.सांजवेळ होताच शेतातून धावत धावत येऊन गाय जेव्हा वासराला चाटते नि त्याच गाईला आपोआप पान्हा फुटतो.हेच तर प्रेम असेल ना..डोळ्यांत पाणी आणून आतुरतेनं वाट पाहणाऱ्या वासराला पाहून तरी मंगेश पाडगावकलरांना “डोळ्यांत सांजवेळी आणू नकोस पाणी” या ओळी सुचल्या असतील का ? “सांज ये गोकुळी,सावळी सावळी ” हे आशा भोसलेंनी गायलेलं गीत ऐकलं की वाटतं सांजवेळ ही सर्वांची आवडती वेळ. सांजवेळी सागरकिनारी बसून निवांतपणे आकाशाचे निरीक्षण केले तर पक्षांचे थवेच्या थवे सोबतीने घरी जाताना दिसतील.म्हणून प्रत्येकाने या सांजवेळीचा सदुपयोग करून जीवनाचा आनंद लुटला पाहिजे नाहीतर या मोबाईच्या नादामध्ये माणूस जवळ असूनही अबोल झालेला दिसून येतो.
सांजवेळ होताच पाराच्या ओट्यावर गप्पांचा फड रंगलेला पुर्वी दिसायचा.घोळक्या घोळक्याने गप्पांची मैफिल रंगायची.हास्यकल्लोळात माणूस तल्लीन होऊन जायचा आणि दुःख सारे विसरून जायचा…परंतु कालौघात सारं नामशेष होत असलेलं आपण पाहत आहोत.
डोळ्यांत सांजवेळी
वाटे दृश्य मनमोहक
मन करी प्रसन्न
सांजवेळ ही खास…
प्रतिमाताईच्या या ओळी बरंच काही सांगून जातात.विष्णूदादांनी सांजवेळेचं वर्णन तर अफलातून केलंय.डॉ.मंजुषा साखरकर,कु.कश्मिरा गुप्ते,शारदा शिंदे,प्रांजली जोशी अशी कित्येक शिलेदार ताई दादांनी सांजवेळेला सजविण्यासाठी,खुलविण्यासाठी अप्रतिम शब्दफुलांची आरास मांडली आहे जशी की दिवस मावळतीला लागताच सूर्यबिंब आकाशात लालभडक,तांबडे शोभून दिसते जणू एखाद्या स्त्रीच्या कपाळी कुंकूमतिलक लावल्यासारखे…तशीच ही मनमोहक,नयनमनोहर सांजवेळ.
सांजवेळ हा विषय देऊन मुख्यप्रशासक राहुलदादांनी शिलेदारांच्या लेखणीला आव्हानच दिलंय जणू… मांडा या सांजवेळेला तुमच्या शब्दातं…कसं मांडायचं ते…अनेकांनी न्याय देण्याचा चांगला प्रयत्न केलेला आहे.दादांनी परीक्षणीय लेखणीच्या निमित्तानं मलाही विविध रचनांचा आस्वाद घेण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद….
जेवढा सूर्योदय मनाला भावतो तेवढीच त्याहीपेक्षा किंबहुना जास्तच या सांजवेळेची ओढ मनाला लागलेली असते.अनेक आठवणींचे मोरपीसं मनाला मोहवित असतात .सांजवेळ शब्दांत मांडताना डायरीही संपून जाते,आपल्या भेटीची संध्याकाळ मनात घर करून जाते.अशीच काहीशी गत माझी झालेली आहे.
काळजाला भिडणाऱ्या शब्दांची आरास मांडून मराठी साहित्याची उंची वाढविण्यासाठी सर्व शिलेदार प्रयत्न करतील याच अपेक्षेने राहुलदादा आव्हानात्मक…भावस्पर्शी व हृदयस्पर्शी…वास्तवाशी सलगी करणारे विषय देतात म्हणून त्या विषयावर सखोल चिंतन करून लेखणीतून शब्दवैभव मांडून डोळे दिपवाल हीच अपेक्षा व सर्वांना पुढील काव्यप्रवासाला शुभेच्छा देतो.
✍️ *श्री.संग्राम कुमठेकर*
*मु.पो.कुमठा (बु.)*
*ता.अहमदपूर जि.लातूर*
*ह.मु. “प्रज्ञासूर्य” निवास बोधेनगर,लातूर*
*सहप्रशासक/परीक्षक/संकलक*
*©️मराठीचे शिलेदार समूह*