
‘आजचा संघर्षच उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो’; प्रा तारका रूखमोडे
_शुक्रवारीय हायकू काव्य परीक्षण_
‘श्रमाची कास
संघर्षावर मात,
यत्न प्रकाश’.
‘जीवन जगणे’ जितके रम्य तेवढेच त्याला सुंदर बनवण्यासाठी पावला पावलावर द्यावा लागणारा लढाही तेवढाच भीषण असतो.जीवनात दुःखानंतर सुख, संघर्षानंतर यश हे दोन्ही एकामागून एक येतात.पण त्यासाठी,जगण्यासाठी प्रत्येकालाच धडपड करावीच लागते. सुरवंटालाही सुंदर फुलपाखरू होण्यासाठी कोशातून बाहेर पडताना कोशाला तडा द्यावाच लागतो. वेदनांना सहन करत बाहेर पडावंच लागतं.झऱ्यालाही पाषाणाला चिरत बाहेर पडावं लागतं. सृष्टीतील प्रत्येकालाच अडथळ्यांच्या काट्यातूनच स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्षरूपी परिस्थितीला तोंड द्यावेच लागते ..”अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर”.ज्येष्ठ कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या काव्यपंक्ती किती अर्थपूर्ण आहेत. कारण आधी त्रास सोसल्याशिवाय सुखाचा घास मिळत नाही. ‘कष्टाविणं फळ ना मिळते’ असेच जीवनाचे तत्वज्ञान सांगते. म्हणूनच पदोपदी संघर्ष हेच जीवन असतं.
पण, मन खंबीर असेल प्रयत्नांच्या जोडीला दुर्दम्य आशावाद व इच्छाशक्ती असेल तर; कोणतीच गोष्ट मनास हरवू शकत नाही, सतत प्रेरणादायी विचार व स्वतःवर आत्मविश्वास ठेवून क्षितीजाच्या पलीकडे झेप घेण्याची मनात जिद्द असली तर संघर्षाला न घाबरता सामोरे जाता येतं. ‘प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जो जातो तोच खरा विजेता. समोरील काळोखरूपी अडचणी दूर करण्याचे बळ स्वतःच असले पाहिजे. विपरीत परिस्थितीत विवेकपूर्ण निर्णय घेतले तर सफलता शक्य असते, संघर्षाच्या पराकाष्ठेतूनच सफलतेचे युग सुरू होते.छन्नीच्या घावाशिवाय दगडालाही देवत्व प्राप्त होत नाही ..’आजचा संघर्षच उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो’..
सध्याच्या स्पर्धेच्या युगात तर क्षणोक्षणी अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते.शिक्षण घेणे,नंतर नोकरी मिळणे,असलेली नोकरी टिकवणे,त्यासाठी कामाचा ताण झेलणे,स्पर्धेला सामोरे जाणे हे कठीण असते.
पण यामध्ये जो माणूस धीराने
प्रत्येक संकटांचा सामना करतो,अडथळ्यांना पार करतो तोच जीवनात यशस्वी होतो.हिंमत न हरता अंधकाराची काळरात्र पार केली कि नक्की आशेची सोनेरी किरणे आपला मार्ग प्रकाशमान करणार आहेत हा विश्वास
प्रत्येकाने मनात जागृत ठेवण्याची गरज आहे.’उषःकाल होता होता
काळरात्र झाली,अरे पुन्हा
आयुष्याच्या पेटवा मशाली’
ह्याच ऊर्जेनी जीवन
प्रकाशीत होते..प्रयत्नांची
महती जाणली पाहिजे.मनात
जिद्द बाळगली तर यश नक्की
मिळेल. पंचभूतांच्या लक्षावधी वर्षाच्या साठलेल्या ऊर्जा माणसांच्या श्रमांचा स्पर्श होताच गुणाकार करीत फळाला येतात.प्रयत्नांची व आशेची ऊर्जा जीवन प्रकाशमान करते हेच मर्म आजच्या हायकूसाठी दिलेल्या चित्राचं आ.राहुल सरांना कदाचित अभिप्रेत होतं.. सर्वांनी जमेल तसा प्रयत्न केला लेखनाचा..तेव्हा सर्व प्रतिभावंत साहित्यिकांचे हार्दिक अभिनंदन..💐💐अशेच माय मराठीच्या सेवेसाठी व जिवनोद्धारासाठी लेखणीच्या स्वयंप्रकाशात पराकाष्टेनं उजळून निघा हिच शुभेच्छा 🙏💐
आ.राहुल सर आपण मला हायकू परीक्षण लेखनाची संधी दिल्याबद्दल आपले हृदयस्थ आभार 🙏🙏🙏
प्रा. तारका रूखमोडे
अर्जुनी मोर जि गोंदिया
परीक्षक/सहप्रशासक/ कवयित्री