गंधवेडा,सुरम्य वैशाख

गंधवेडा, सुरम्य वैशाख



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

वैशाखफुलांचा दरवळ
वैशाख रंगांची प्रभावळ
वैशाख सुरावलींची मैफल
वैशाख सूर्याची तेजावळ

आज भल्या पहाटेच जाग आली. मी बेडवर उठून बसले.एवढ्यात खिडकीतून वाऱ्याची हलकीशी झुळूक आली. पण, ती गंधित होती. मला जाणवले हा तर
मदनबाणचा गंध. अरे वा,माझा मदनबाण फुलला का? थोड्या वेळाने उजाडलं आणि पाहिलं माझ्या बाल्कनीत मी हौसेनं लावलेला मदनबाण फुलू लागला होता.आता चार फुले फुलली. मला फार आनंद झाला आणि प्रकर्षानं एक गोष्ट जाणवली. अरे वैशाख मास अगदी जवळ आला. मदनबाण हा वैशाख महिन्याचा मानबिंदू. मोगरा, सायली जाई जुई, चमेली आणि हा मदनबाण या महिन्यात उच्च कोटीच्या सुंगधाची उधळण करीत असतात.

वास्तविक या महिन्यात कडक उन्हं असतात. सूर्याचे तीव्र तेजस्वी शर बरोबर आपल्यावर संधान साधून असतात. रवीराजाचं हे तेजस्वी रुप फार प्रखर तेजानं झळकत असते.दिवस मोठे होऊ लागतात.कडक उन्हं.त्यात गंधाची उधळण.रंगांची आपसातील चढाओढ.काय कमालीचं रंगतदार वातावरण असते. गुलमोहोर अगदी आतून रंगबावरा होतो.तर बहावा सोनपिवळ्या कळ्याफुलांची झुंबरं
अंगांगावर मिरवत असतो. अगदीबांधा वरच्या बाभळीला ही फुलायचे वेड लागते.तिची गोंड्यासारखी पूर्ण केसरयुक्त गोल गोंडस फुलं अंगभर लेवून ती अगदी पूर्ण सौंदर्यानिशी दिमाखात उभी असते.

या सर्व गडबडीत पक्षीही मागे नसतात. कारण, काही घरटी बांधण्यात मग्न, काही घरट्यातील पिलांना भरवण्यात दंग. कोकिळा बरोबर आता वैशाखात बुलबुल पक्ष्यांचा गळा खुला झालेला असतो आणि त्यांच्या सुरेल मनभावन ताना
मनाला तरतरी देतात. खरंतर, बुलबुल पक्ष्यांच्या मुखातून वसंतच गातो असे वाटते. वैशाख महिन्यात निसर्ग
गंधाळतो, रंगतो, तसाच हा व्रतस्थ महिनाही आहे.

पूर्ण वैशाख महिन्यात सूर्याला अर्घ्य (जल)देतात, नदी, सरोवरात स्नान करतात.तसेच उत्तराखंड येथील परमपावन बद्रिनाथ मंदिराचा दरवाजा या महिन्यात वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय तृतीयेला उघडला जातो.जगन्नाथ पुरी येथील रथयात्रा याच महिन्यात शुद्ध व्दितीयेला निघते. शुध्द नवमीला सीता भूमीतून प्रकट झाली अशी मान्यता आहे.या महिन्यात पौर्णिमेला अनन्यसाध़ारण
महत्व आहे. तो दिवस बुध्द जयंती म्हणूनच साजरा केला जातो.वैशाखातील एकादशी ही मोहिनी एकादशी. समुद्रमंथनावेळी अमृत निघाले.त्यावेळी विष्णूंनी मोहिनी रुप
घेतले ते याच दिवशी.अशा रीतीने वैशाख हा व्रतांचा,दानाचा सुद्धा महिना आहे.या महिन्यात जलदानाचे महत्त्व आहे.वाटसरूंसाठी रस्त्याच्या कडेला मातीच्या घड्यात पाणी ठेवले जाते.तसेच पाणपोया सुरु केल्या जातात.आपल्या पितरांना शांती मिळावी म्हणून हे जलदान करण्यात येते.

वैशाखातील रात्री या हव्याशा वाटतात. चांदण्यांचे तेज जरी थोडेफार मंदावले असले तरी दिवसभराच्या तलखी नंतर गारवा देणाऱ्या रात्री सुखद वाटतात.पण पौर्णिमेला तर सौंदर्याचा अत्युच्चबिंदू चंद्राच्या चांदण्यानं गाठलेला असतो. अगदी अंतर्गर्भाला सादावणारी ही प्रसन्न पौर्णिमा म्हणजे स्वर्गीय सुख.रातराणी, मोगऱ्याच्या गंधानं
भारावलेली, शांत हवीशी. वसंताच्या गंधसृष्टीचे पूर्ण वैभव वैशाखातच असते.अगदी फुलांच्या गंधाचा परम उत्कर्ष याच महिन्यातला.जे जे वसंत ऋतूचे आहे त्याला पूर्णत्व आणि विराम देण्याचे कामही चैत्र सखा या नात्याने वैशाखास पूर्ण करावे लागते. वास्तविक सौंदर्याची ही विकलावस्था धीरोदात्तपणे वैशाख पाहतो. त्यामानाने चैत्र हा मनाने अतिशय हळवा वाटतो. सौंदर्याची ही अवस्था, ही विपन्नावस्था चैत्र बघू शकणार नसतो पण ते काम वैशाख पूर्ण करतो कारण त्याला ज्येष्ठाच्या मदतीने सृष्टीचा नूर आणि तोल सांभाळायचा असतो. अगदी झाडाची पाने सुद्धा टपटप गळताना तो पाहतो.तर असा हा गंधवेडा,सुरम्य आणि रुपरंगाचा चाहता,सौंदर्यासक्त, तसाच व्रतस्थ,आणि धीरगंभीर स्वभावाचा कर्तव्यदक्ष वैशाख.याचं मोठेपण अगदी मनाला भावून जातं.

वैशाख सुरम्य मनभावन
गंधवेडा रंगूनी तनमन
स्वरवेडा हा हरपून भान
परी हा कर्तव्य परायण

वृंदा (चित्रा) करमरकर.
सांगली,जिल्हा:सांगली.
=========

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,876FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles