
माणूस बदलतो, की….. संदर्भ
परिवर्तन हा नियम निसर्गाचा
बदल हा गुण मानवाचा…
कसा बदलतो मग माणूस?
आरोप त्यावर काय कामाचा….
स्थळ, काळ, वेळ, परिस्थितीनुसार माणूस बदलत राहतो.आज आपल्या बरोबर चांगले वागणारी माणसे उद्या तशीच वागतील किंवा वाईट वागणारी वाईटच वागतील हे आपण कधीच ठरवू शकत नाही. आधी तो तसा नव्हता आता तसा का वागतो, काय माहित…असा बोलणाऱ्यांचा सूर नेहमी कानी पडतो.प्रत्येकाकडे आपण आपल्याच चष्म्यातून पाहत असतो. त्याला आपल्या जागी किंवा आपल्याला त्याच्या जागी ठेवणे आपल्याला जमतच नाही.मग आपले ते खरे आणि समोरचा कसा चूक हे सिद्ध करण्यात आपण वास्तव पाहूच शकत नाही.किंबहुना ते दिसत असले तरी आपला ‘अहं’पणा ते स्विकारत नसतो.
बऱ्याच वेळा जीवनात अशी काही वळणे येतात, की माणसाला बदलावेच लागते..नकळत तो बदलतो.मग मनात असो वा नसो, त्याला मनावर दगड ठेवून वाटचाल करावी लागते. जीवनात जसजसे पुढे जावे,, तसतशी नवीन माणसे, अनुभव,ओळखी, दृष्टी भेटत जाते.आपल्या सोबत असणाऱ्या व्यक्ती त्यांचे विचार नकळत मागे सुटत राहतात.त्या कालौघात कधी हरवतात समजत नाही.एकांती त्या आठवतात … पण पुढे वाटचाल करायची तर त्या आठवांना मागे सारूनच चालावे लागते,मग त्या गोड कटू आठवणी असू शकतात.मागचे अनुभव सोबत घेऊन पुढे चालावेच लागते.
झाले गेले विसरून जावे
पुढे पुढे चालावे
जीवनगाणे गातच राहावे….
मग याला बदलणे म्हणावे का? नक्कीच नाही.. कारण पुढे जायचे तर सर्वांना सोबत घेऊन चालणे शक्य नसते. काही वेळा समजून घेण्याच्या चुकीमुळे गैरसमज वाढत जातात, मनमोकळे न बोलण्यानेही नाते दुरावतात आणि रस्ते बदलतात..हे रस्ते एकत्र आणणे फारसे अवघड नाही परंतू तेवढी सजगता, समजूतदारपणा, ओढ आवश्यक असते. कधी कधी इच्छा असूनही नाते टिकवता येत नाही.आसपासच्या माणसांना ते मान्य नसते.संकुचित विचार सरणीच्या माणसांमुळे नाते आणि प्रगती दोन्ही धोक्यात येते.नाते डागाळून हानी होते… नाते आणि माणसांचीही…कटकट नको म्हणून दूर राहणे सोईस्कर बनते. समाज, कुटुंब, नातेवाईक सांभाळून काही करायचे तर खूप पायबंद येतात.. मग माणूस बदलला का? काही व्यक्तींमुळे बदलावे लागते मग तेथे चूक कोणाची?
प्रत्येक वेळी मीच का समजून घ्यावे,पडती बाजू मीच का सांभाळावी यामुळे ही माणसे दुरावतात.. कधी कधी हा दुरावा कायमचा असतो. प्रत्येकाचे विचार स्वदृष्टीतून बरोबरच असतात अशावेळी गरज पडते. स्वयंमूल्यमापनाची… आत्मपरीक्षणाची ….असे मला वाटते… मग खरच माणूस बदलला का?? परिस्थितीनुसार, अनुभवानुसार माणूस बदलत राहतो..बदल हेच प्रगतीचे लक्षण असते.
माणसा माणसाला समजून घे
एकमेकांना साथ दे
कमी जास्त होईल काहीही
माणसा माणुसकी जाणून घे…
म्हणूनच माणूस नव्हे तर…. संदर्भ बदलतात…!!!!!
शर्मिला देशमुख -घुमरे, बीड
======