
‘त्रिवेणी’ काव्यलेखन करताय ? चला तर जाणून घेऊ या काही साधे नियम…!!!
‘त्रिवेणी काव्यरचना करतांना लक्षात ठेवावयाचे सोपे नियम’
🌀 त्रिवेणी हा काव्यप्रकार भारतात सर्वप्रथम कवी गुलजार यांनी हिन्दी भाषेत विकसित केला. मराठीत याचे प्रचलन कोणी केले याबद्दल काही निश्चित माहीती उपलब्ध नाही.
इथे त्रिवेणाच्या नियमांत थोडी सुधारणा करून या काव्यप्रकाराला अधिक आकर्षक बनवण्याचा प्रयत्न केला आहे.
⭕ त्रिवेणी रचनेचे नियमः-
🌀 १) त्रिवेणी नावाप्रमाणेच तीन ओळींची साधीसुदी रचना असते. याला विषयाचे बंधन नसते.
🌀 २) पहिल्या दोन ओळीत एक विचार मांडला जातो आणि तिसरी ओळ कधी पहिल्या दोन ओळींच्या अर्थामध्ये भर घालते तर कधी त्यांना वेगळा दृष्टीकोन देते.
🌀 ३) ही रचना तीन ओळीत मर्यादीत होत असली तरी यात हायकू प्रमाणे प्रत्येक ओळीत अक्षरांची ठराविक मर्यादा नसते. तर पहिल्या आणि तिसऱ्या ओळीत अक्षरांऐवजी शब्दांची संख्या सारखी असते आणि दुसऱ्या ओळीत रचना लयबद्ध आणि अर्थ पूर्ण होईल इतकेच शब्द असतात.
🌀 ४) पहिल्या आणि दुसऱ्या किंवा पहिल्या आणि तिसऱ्या ओळींत यमक जुळलेले असावे.
🌀 या रचनेला त्रिवेणी नाव दिले गेले कारण इलाहाबादच्या त्रिवेणी संगमाप्रमाणेच इथेही तीन ओळींचा संगम होतो. तिथे संगमावर गंगा आणि जमुना आपल्याला स्पष्ट दिसतात पण तक्षशिले कडून वाहत येणारी सरस्वती संगमावर आल्यावर दोघांच्या प्रवाहात बेमालूम मिसळते, तिथे तिचे वेगळे अस्तित्व दिसत नाही. सरस्वती प्रमाणेच त्रिवेणीची तिसरी ओळही या रचनेला पूर्णत्व देते. तिसरी ओळ स्वतंत्र असली तरी ती पहिल्या दोन ओळीत बेमालूम मिसळते. अर्थात पहिल्या दोन ओळीतील गुढ तिसऱ्या ओळीत उमगते.
⭕ उदा०
वेशीवर सैनिकांची गस्त
उन्हा-पावसात, हिमवर्षावात
झोपती देशवासी निर्धास्त
लेक वाढते लाडात
सावलीत माय-पित्याच्या
जणू निरांजनाची फुलवात
*संकलन: मराठीचे शिलेदार ‘त्रिवेणी’ काव्यसमूह प्रशासन*