स्नेहपूर्ण नजरेतील सामर्थ्य अर्थातच ‘स्नेहवलय’; सविता पाटील ठाकरे

स्नेहपूर्ण नजरेतील सामर्थ्य अर्थातच ‘स्नेहवलय’; सविता पाटील ठाकरे



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेचे परीक्षण_

मातृऋण, पितृऋण, समाजऋण आपल्या समाजात सर्व संमत आहे. समाजरचनेत बदल होतात. ते मनापासून स्वीकारले जातातच, असे नाही. तरीही आपण स्वीकारतो. कधी नाईलाज म्हणून, कधी सक्ती म्हणून तर कधी या बदलांना गोंडस अवगुंठन चढवून, आपण कर्तृत्वाने स्नेहाचे वेगळे दालन सजवतो. स्नेह.. अर्थातच प्रेम, प्रिती, दोस्त, सख्य, ममता, आपुलकी, जिव्हाळा औदार्य, आत्मीयता, अनुबंध अन् खूप काही…. अन् अशा स्नेहाचं तुला लाभलेलं वलय.. अर्थातच “स्नेहवलय” खरंच ग! किती गोड आहेस ना तू !!!!
होय वलयच आहे तुझ्या भोवती वेढलेलं,वेष्टलेलं,वर्तुळाकार मांडलेलं…..!!

तू.. अडलेल्या नडलेल्यांना मदत करतेस….
तू..कुणाच्याही हाकेला ओ देतेस….
तू..कुणालाही कधीच दुखवत नाहीस….
तू..स्वतःला कर्मनिष्ठ ठेवतेस….
तू..इतरांना मार्ग दाखवतेस….
तू..सर्वांना प्रेमानं जिंकतेस….
तू..कधी कुणाची सावली तर कधी कुणाची छत्री होतेस….
तू..खाच खळग्यांनाही फुले समजतेस….
तू..तुझ्यावर जळणाऱ्यांनाही अमृत पाजतेस…
तू..दगडालाही पाझर फोडतेस….
तू..निर्भीड सत्य मांडतेस….
तू.. आदर्शला नेहमी प्रणाम करतेस….
तू..पाठीवरचे घावही सोसतेस….
आपल्या प्रत्येक कामावर पुत्रवत प्रेम करणारी सानेगुरुजींची स्नेहमूर्ती आपल्यासमोर आदर्श आहे. डॉक्टर, वैद्य आणि रोगी यांचे संबंध स्नेहपूर्ण असतील तर औषध लवकर लागू पडते. स्नेहपूर्ण नजर सामर्थ्य देणारी असते. आश्वासक असते. अक्कलकोट स्वामींची स्नेहपूर्ण नजर ‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे’ असा आधारस्तंभ ठरते. विनोबा भावे यांच्या स्नेहपूर्ण वर्तनाने चंबळच्या खोऱ्यातले दरोडेखोर शरण आले आहेत. चांगले विचार चांगल्या कृतीस संक्रमित होतात.

मग माझ्या मनात विचार आला की “स्नेहवलय” का नसेल ग !! तुझ्या भोवती????
“स्नेहवलय”….असंच का लाभते का कुणालाही??
त्यासाठी झिजावं लागतं..
त्याग करावा लागतो…
कष्टांनं मोडावं लागतं.
वाकावं लागतं…
झुकावं लागतं..
आता मला कळलंय ग तुझ्याभोवतीच्या या वलयाचे रहस्य….!

सखी… खरंच मोठा स्नेहाचा गोतावळा निर्माण केलाय तू तुझ्या भोवती.
कधी तू स्नेहसंमेलनातली आमंत्रित असतेस. तर कधी स्नेहभोजनातली सुरुची असतेस.. कधी स्नेहालयातील उत्सव मूर्ती असतेस..तर कधी स्नेहभाव टिपणारी गोड कौतुक करणारी लाजरी साजरी असतेस. म्हणूनच तर तुझी स्नेहभेट घ्यायला माझ्यासह सर्वच मैत्रिणी उत्सुक असतो. एक विचारू?? कसं ग जमतं तुला हे सर्व??? आणि हे सर्व करतांना तुझे पाय मी कधीच हवेत नाही पाहिलेत. तू नेहमीच जमिनीवर राहून उंच आकाशातल्या ताऱ्यांना आपलंसं करतेस… मला नेहमी असंच वाटतं ग…नारीत्वाच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी खंबीरपणे पुढे जात तुझ्यासारखे स्नेहवलय निर्माण करणे हीच काळाची गरज आहे.

‘स्नेहवलय’ मराठी भाषेच्या शब्द भांडारातल्या अनेक शब्दरत्नांपैकी एक शब्द. ‘मराठीचे शिलेदार’ समूह आयोजित बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेसाठी समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सरांनी हा अनोखा विषय दिला आणि सर्व कवीकवयित्री लिहिण्यास प्रवृत्त झालेत. खूप छान व्यक्त झालात आपण सर्वच..आणि खऱ्या अर्थाने विषयाला न्याय मिळाला.तेव्हा तुम्हा सर्व कवीकवयित्री ताई दादांचे मनस्वी अभिनंदन. आणि पुढील काव्य लिखाणास अनंत कोटी शुभेच्छा..!!!

पण थोडं काही…!!

अल्पमोलाचा क्षणभंगुर पतंगही दिगंतराची यात्रा करू शकतो. आपणही आकाशाला गवसणी घालू शकू. सुरवातीला पतंग वर चढवायला थोडी कला, थोडी युक्ती, थोडे धैर्य, थोडे साहस आणि थोडा संयमही हवा. सुरवातीची धावाधाव, खेचाखेच पतंग उंच गेल्यावर करावी लागत नाही. मग नुसता दोरा हातात धरून ठेवायचा पतंग हवेत मुक्त संचार करतो. निसर्गाच्या अनुकूलतेची संगत सोबत धरून आपल्या जीवनाचा पतंग म्हणजेच ध्येयरूपी पतंग जमिनीवरून ध्येयाच्या दिशेने उंच जावा. आकाशात कीर्तीरुपाने तरंगत राहावा.

कविता म्हणजे केवळ यमक जुळवणी, लय,शब्द संख्या यात तिला बांधणे हा समज आधी आपण दूर करूया. आपल्या ज्येष्ठ कवयित्री, मुख्य परीक्षक, सहप्रशासक आदरणीय वैशालीताई अंड्रस्कर (माझी ताई) यांच्या कविता वाचा. त्या मुक्तछंदात खूप सुंदर व अर्थपूर्ण कविता लिहितात. कविता लिहितांना त्यात अमुक इतक्या ओळी त्या ओळींमध्ये अमुक इतके शब्द. त्या शब्दात अमुक इतके -हस्व आणि दीर्घ अशी अक्षरे.अमुक इतक्याच ओळीत यमक आवश्यक,अशी बंधने झुगारून जे काव्य निर्माण होते ती मुक्तछंदात लिहिलेली कविता होय. मुक्तछंदात छंदाचा वापर असतो परंतु कुठल्या ओळीत कुठला छंद वापरायचा हे कवी ठरवतो. तेव्हा निश्चितपणे प्रयत्न करूया आपण कधीतरी मुक्तछंदात लिहिण्याचा यासाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा💐💐

सौ सविता पाटील ठाकरे,सिलवासा
मुख्य परीक्षक/प्रशासक/कवयित्री/लेखिका

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles