
‘फळांचा राजा’ ना मग आंबट कसला? स्वाती मराडे
_गुरूवारीय चित्र चारोळी स्पर्धेचे परीक्षण_
गुलाबी थंडीत आम्रतरू मोहरला.. फुलला मनमयूर, तो आतुरतेने बावरला.. दिसामासाने वाट पाहिली.. हवीहवीशी चाहूल लागली.. गोडगुलाबी स्वप्न पडे, फांदीवरती झुलेल कोणी.. रम्य त्याच्या सहवासाने हर्ष असा दाटेल मनी.. येईल मधुराणी मधुगंध तो चाखायाला.. मिलनदूत होऊनिया मोहरत्या कलिकेला भेटायाला..!
रूप गोजिरे वाढू लागले.. कलेकलेने सजू लागले.. आली ती गोड वेळ.. फांदीवरी झुलू लागले फळ.. डोईवर पानांची धरली छत्री, देठांनी आधाराची दिली खात्री.. इवला तो गोळा बाळसे धरू लागला, नटखट गुण घेऊन कैरीमध्ये बदलला. इवल्या त्या कैरीचा नखरा भारी, म्हणे..आहे थोडी नटखट पण मी आंबट नाही.. खाल तुम्ही पटापट याची देते ग्वाही…!
अहाहा.. कैरी पाहिली तरी तोंडाला पाणी सुटतं. आंबट चवीची अनेक फळे आहेत पण त्या आंबटपणातही कैरीचा शौक तो निराळाच. वर्षातून एकदाच मिळणारे हे फळ. कदाचित त्यामुळेही त्याचे अप्रूप असेल. काहीही असो.. कैरी आंबट असो, आंबटगोड असो किंवा खोबरी आंब्यासारखी मधुर स्वादाची असो… दिसली की खाऊ वाटली नाहीतर नवलच. खरेतर आंबा हाच फळांचा राजा आहे. कैरीच्या रूपात असतानाही लोणचं, पन्हं, डाळं अशा अनेकविध पदार्थात सामावून जातो. कधी तशीच तर कधी हळद मीठ लावून खाल्लेली बालपणातील कैरी आठवली तरी जिभेवर क्षणभर ती चव रेंगाळून जाते. कैरीचा हाच नटखटपणा बदलून हळूहळू परिपक्वतेकडे तिला नेतो. तेव्हा हे फळ अंतर्बाह्य बदलते. सोनेरी रंगाचा साज घेऊन त्याचं मनही सोनेरीच होऊन जातं. त्याचं माधुर्य आमरसाच्या रूपात चाखलं तरी अमृताची गोडी वाटते. त्याचा आधीचा आंबटगोडपणा जाऊन केवळ उरतो तो गोडवा. आंबटपणा दूर सारून केवळ गोडवा जवळ ठेवतो म्हणूनच तो राजा असेल का? आणि म्हणूनच तो म्हणत असेल मी आंबट नाही.
बालपणातील नटखटपणा जाऊन हळूहळू आपल्यातील दोष दूर सारत जो परिपक्वतेकडे वाटचाल करतो व जीवनात अवीट गोडी निर्माण करतो तो मनुष्यही मनाने राजाच नाही का? या आंब्यासारखा.. मी आंबट नाही असे सांगणारा. मग असतील काही दोष तर सकारात्मकतेने दूरही करा. जीवनात नटखटपणा, आंबटगोडपणा हवाच पण तोही योग्य संस्कार करून मुरलेल्या लोणच्यासारखा हवाहवासा वाटावा.
आजच्या स्पर्धेसाठी आलेला विषय ‘मी आंबट नाही’ याच सकारात्मक विचारांनी भारलेला. आंब्यामध्येही खोबरी आंबा, पायरी आंबा हे आंबे कधीच आंबट लागत नाहीत. एकाच आईच्या लेकरांच्या स्वभावात जशी भिन्नता असते अशीच विविधता निसर्गातही अनुभवायला मिळते. आंब्याच्या बाबतीतही हेच म्हणावे लागेल. ऋतूसापेक्ष असलेले आजचे चित्र व त्यास अनुसरून आपण सर्वांनी लिहिण्याचा केलेला प्रयत्न कौतुकास्पदच. आपणा सर्वांचे लेखन मनास भावले. पण चित्रापलीकडेही विचार करून लाक्षणिक अर्थानेही लिहावे असेही वाटते. चित्र वर्णन तर हवेच पण मतितार्थही जाणून घ्या. लेखणीची उंची वाढेल एवढे नक्की. सर्व सहभागी रचनाकारांचे हार्दिक अभिनंदन 💐
आदरणीय राहुल दादांनी मला परीक्षण लेखणीची संंधी दिली त्यांचे हृदयस्थ आभार 🙏
सौ स्वाती मराडे, पुणे
मुख्य परीक्षक/लेखिका/कवयित्री