
अपेक्षांचे ओझे
वाहते मी जीवनभर ,
अपेक्षांचे ओझे डोईवर,
जीवनाच्या प्रत्येक पर्वावर||
जन्म घेताच मुलगी,
तर कधी बहीण म्हणून ,
मुलगी म्हणून कामांच्या अपेक्षा,
बहीण म्हणून भाऊ बंधांप्रती
कर्तव्य अभिलाषा||१||
आता पर्व आले दुसरे,
लग्न झाले माझे,
माहेर सोडले सासर धरले ,
नाती आणि अपेक्षा बदलली,
आता आहे मी बायको ,
तर कुणाची सून,
अपेक्षांचे ओझे
इथेही आहे भरभरून||२||
सुरू झाले पर्व तिसरे,
आता झाले मी आई
दुधाचा पान्हा मायेचा झरा,
तन मन मुलांसाठी करा||३||
चौथे पर्व भेटीला आले
झाले मी सासू,
वाटे पद आणि वयस्कपणाचे ओझे,
हाताची घडी तोंडावर बोट,
घरात शांती,भरेल सर्वांचे पोट||४||
त्यामागे धावत आले पर्व पाचवे,
नातवंडं आणि आजीचे,
आता अपेक्षा अनुभवांची,
पिकलेल्या पानाची||५||
काय माझ्या अपेक्षा,
या सर्वात होते मी कुठे ?
एकेक पर्व पार करता,
मीच राहिले नाही माझे||६||
सर्वत्र जपली अपेक्षांची नाती,
जपता जपता नाती
झाल्या माझ्या वाती,
आणि झाले मी त्यांची ज्योती
करून आयुष्याचे तेल
जळ! जळत राहा !!जळत राहा!!
अपेक्षांचे ओझे वाहत रहा..!
उर्मिला गजाननराव राऊत
फ्रेंड्स काॅलनी,नागपूर