
धक्कादायक…! वसतिगृहातील विद्यार्थ्याकडे सापडला देशी कट्टा व जिवंत काडतूस
_तरुणाईची पावले चालती गुन्हेगारीची वाट_
बुलढाणा : विदर्भातील महत्वाची शहरे ही गुन्हेगारीकडे वाटचाल करीत असून यात तरुणाई ढकलली जात असल्याची चर्चा आहे. शिक्षक आणि पालकांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. सामान्यपणे विद्यार्थ्यांच्या दप्तरात वही, पेन आणि शालेय साहित्य पाहायला मिळते. मात्र, बुलढाणा जिल्ह्यातील एका वसतीगृहातील विद्यार्थ्याकडे चक्क पिस्तूल आणि जिवंत काडतूस मिळाली आहेत. पोलिसांनी सापळा रचून संबंधित विद्यार्थ्याला ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, या घटनेमुळे खामगाव शहर परिसरात एकच खळबळ माजली आहे.
*काय आहे घटना?*
बुलढाणा जिल्ह्यात बीएससीचे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याजवळ देशी पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसे आढळून आले आहेत. या विद्यार्थ्याने देशी पिस्तूल आणि जिवंत काडतूस घेऊन थेट वस्तीगृहात प्रवेश केला होता. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून या विद्यार्थ्याच्या वस्तीगृहातील खोलीची झाडाझडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी कट्टा आणि पाच जिवंत काडतुसे आढळून आली आहेत. नितीन भगत असं 21 वर्षीय या विद्यार्थ्याचं नाव आहे.
पोलिसांनी देशी पिस्तूल आणि 5 काढतुसासह या विद्यार्थ्याला अटक केली आहे. मात्र, शिकत असणाऱ्या नितीनकडे ही बंदूक आलीच कशी आणि त्याने कोणत्या कारणासाठी ही बंदूक वस्तीगृहात आणली? याचा तपास आता खामगाव पोलीस करताना पाहायला मिळत आहेत. मात्र, शिक्षण घेण्याच्या वयात या विद्यार्थ्याकडे बंदूक आलीच कशी? असा प्रश्न सर्वसामान्य विचारात आहेत. त्यामुळे खामगाव शहर परिसरात एकच खळबळ माजली आहे.