
कोमेजले मन
तुझ्याविन सख्या मज
क्षण युगाचा भासतसे
काळोख मिठी भवती
एकलीच मी रे राहतसे
शिशिरातील पानगळ
नको जाहले हे जिणे
तुझ्या विरह वेदनात
नकोय आर्त विव्हळणे
जीवाची या घालमेल
कोण मला सावरी रे
याद अनावर होतीय
उदास मना आवरी रे
वैराण रान सभोवती
नसे फुलांचा दरवळ
तना मनास घेरलेली
अशी नैराश्य मरगळ
नको जरासाही आता
लवलेश मज वेदनेचा
तुझ्या मिठीत लाभू दे
क्षणोक्षण मज प्रेमाचा
कानी माळलेली कुंडलं
रे कशी गळून पडली
गळ्यातील मौक्तमाळ
निखळूनिया विखुरली
जवळी तू येताच सख्या
कोमेजले मन रे खुलले
ऐन ग्रीष्म काळात जणू
गाली गुलमोहर फुलले..
सविता पाटील ठाकरे, सिलवासा
मुख्य परीक्षक/ प्रशासक/ कवयित्री
========