
ऋणानुबंध व आपुलकी मराठीच्या शिलेदारांची…अविस्मरणीय आठवण
अशोक लांडगे,नेवासा विश्वस्त प्रमुख मराठीचे शिलेदार संस्था
पुणे/इंदापूर/नेवासा: अविस्मरणीय अशा आठवणींचा खजिना भरगच्च भरतांना त्यात आवर्जून उल्लेख करावा असा जीवनप्रसंग अधोरेखित केल्याशिवाय आयुष्यास परिपूर्णता येणार नाही यावर माझातरी ठाम विश्वास आहे. मागील आठवड्यात माझी कन्या कु. मयुरी हिच्या एका परीक्षेचे हॉल तिकीट आले. हॉल तिकीटावर परीक्षा केंद्र इंदापूर जिल्हा पुणे पाहिले आणि क्षणभर मला चिंताच वाटली.
परंतु दुसऱ्या क्षणी मला ‘मराठीचे शिलेदार’ परिवाराची आठवण झाली. नक्कीच, कुणीतरी इंदापूर मध्ये आहे हा विश्वास मनाशी व्यक्त केला व तात्काळ मुख्य परीक्षक, प्रशासक माझ्या सहकारी ‘सविता ठाकरे’ सिलवासा यांच्याशी संपर्क करून त्यांना यासंदर्भात सविस्तर विचारले असता, त्यांनी स्वातीताईंचं नाव घेऊन आपली व्यवस्था होईलच हा विश्वास मला त्यांनी दिला. लगेचच त्यांनी स्वतः मुख्य परीक्षक, सहप्रशासक, लेखिका व कवयित्री असलेल्या ‘स्वातीताईं मराडे’ सोबत संपर्क साधला.
स्वाती ताईंनीही मदतीसाठी तत्परता दर्शवली तशा त्या कार्यतत्पर आहेतच . त्यांनीही माझ्याशी संपर्क साधत मदतीसाठी आश्वस्त केले. मी निर्धास्त झालो. मुलगी मयुरी परीक्षेसाठी गेली असता स्वातीताईंचे गाव थोडे दूर असल्याने त्यांनी जवळच राहणाऱ्या प्रसिद्ध कवयित्री, लेखिका ‘सिंधुताई बनसोडे’ यांचे नाव सुचवले. पुन्हा एकदा सविता ताईंनीच मदत केली. माझा सिंधूताईंसोबत अजिबात संपर्क नव्हता; तरी असता सुद्धा त्यांनी कु. मयुरीला आपल्या घरी नेले व संपूर्ण दिवसाची पूर्णपणे व्यवस्था केली. आणि मग माझ्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की हे ऋणानुबंध जुळण्याचे भाग्य आपल्याला कसे लाभले ?
त्याचे एकमेव उत्तर म्हणजे ‘मराठीचे शिलेदार समूह’, तसं पाहता आपण सर्वजण एकमेकांपासून फार दूर राहतो. तरी केवळ एक शिलेदारी ऋणानुबंधाने आपण एकमेकांच्या एवढे जवळ आलो, की वेळप्रसंगी तात्काळ आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही मदत होऊ शकते. आपल्या या परिवारात फक्त द्यायचे माहीत, घेणे कुणाच्याही मनात नाही. सारेच इथे नम्र होतात, साऱ्या निराशा खिन्नत्व जाऊन नवचेतना संचारते ती याच मराठीचे शिलेदार परिवारात. अहंकाराची झूल कुणाच्याही अंगावर कधीही दिसत नाही. शांती, प्रीती स्थापन करणारा हा परिवार सहकार्य प्रेमभाव वसवणारा आहे. सुखदुःखात साथ देतो वृद्धापकाळ देखील इथे भिवून पळतो. या परिवाराच्या छायेत सुंदर जीवन जगण्याचं भाग्य लाभते.
मग मला आठवलं, ‘ज्येष्ठ कवी नागोराव कोंपलवार’ दादांना त्यांच्या मुलीसाठी आमच्या श्रीरामपूरच्या कवयित्री, लेखिका अनिताताई व्यवहारेंने केलेली मदत असो, की सुधाताईंच्या मुलासाठी राहुल सरांच्या नांदेडच्या शिक्षक मित्राने केलेली मदत असो. कवयित्री राजश्रीताईंच्या मुलीसाठी औरंगाबाद येथे विष्णूदादांनी केलेली मदत असो की, सविताताईंच्या मुलीसाठी कोपरगावला विकासदादाने केलेली मदत असो. सिंधुताई व स्वातीताईंनी मला केलेले सहकार्य असो. हे सारे सर्व ऋणानुबंध इथेच जुळतात हे असेच जुळत राहावे हीच सदिच्छा.
शेवटी..
अनंत आहे मानवजाती
असंख्य होती गाठीभेटी,
परी शिलेदार परिवारासम
न पाहिली मी मानव्याची मूर्ती.
अशोक लांडगे, नेवासा
विश्वस्त प्रमुख
©मराठीचे शिलेदार समूह