
अश्वत्थामा भाऊ आणि सुधाताई मेश्राम आधारवड मराठीचे शिलेदार समूहाचे….!
वर्ष २०१७ मे महिन्याची २२ तारखेची ती काळरात्र….जिने मराठीचे शिलेदार समूहाचे एक रत्न हिरावून नेले. राहुलदादांच्या जोडीने मराठी भाषा सक्षमीकरणासाठी ध्यास घेऊन ज्यांनी हा समूह निर्मिला त्या अश्वत्थामा भाऊंना अर्ध्यावर डाव सोडून नियतीने आपल्यापासून दूर घेऊन गेले.
माझी चारोळी लेखनाची जेमतेम सुरुवात झाली होती. विश्वस्त आवारी सरांच्या माध्यमातून जुळलेली मी कुणालाही पुरेपूर ओळखतही नव्हते. त्याचवेळी ही घटना घडली. कुणास ठाऊक अक्षराचाही संपर्क नसताना, कधी अश्वत्थामा भाऊंना मी बघितले नसताना सुद्धा आपसूकच त्यांच्यासाठी चार ओळी सुचून गेल्या.
*माय मराठीच्या ओढीने*
*आले मराठीचे शिलेदार समूहात*
*का कोण जाणे पुरत्या ओळखीआधी*
*जुळवावे लागले श्रद्धांजलीसाठी हात*
भाऊंच्या जाण्यानंतर सुधाताईंनी मात्र हार मानली नाही. अंतरात दुःखाचा खोल डोह होता पण राहुलदादांच्या समूहाच्या बाबतीत प्रत्येक कार्यात तन-मन-धनाने सहभागी होऊन अश्वत्थामा भाऊंची उणीव भरून काढण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. नुकताच आपण मराठी भाषा गौरव दिन विशेषांक २७ फेब्रुवारी २०२३ ला प्रकाशित केलेला. आर्थिक बाबींमुळे राहुलदादा डिजिटल अंकाच्या विचारात होते. मात्र सुधाताईंनी धडपड केली. माझ्याशी संपर्क साधला…. म्हणाल्या… वैशालीताई हवं तर आपण थोडी थोडी मदत करू पण अंक छापू या. आपण सर्वांनीच त्याला दुजोरा दिला आणि अंक हातात आला.
आणखीन एक म्हणजे कार्यक्रम कुठेही असो….सुधाताई मंचावरील नियोजनात कुठेही कमी पडत नाहीत. सत्कारमूर्तींसाठी तयार असलेले साहित्य अतिशय तत्परतेने आमच्या सर्व सहप्रशासकांच्या सहकार्याने पाहुण्यांपर्यंत पोहचवण्यात त्यांचा हातखंडा आहे….म्हणूनच आम्ही जरा निश्चिंत असतो. अशा या सुधाताई अश्वत्थामा भाऊंच्या मराठी भाषा सक्षमीकरणाच्या ध्यासात कुठेही कमी पडत नाही.
भाऊंच्या माघारी घर, मुलांचे संगोपन, शिक्षण, समाजकार्य या सर्वांमधून त्या हे सर्व करत असतात. भाऊंची उणीव जाणवू न देता आदरातिथ्य करावे ते सुधाताईंनीच….सौंदड येथील संमेलनानिमित्त त्यांच्या घरी अर्जुनीला मुक्कामी गेले असताना आलेला हा अनुभव म्हणजे माझ्यासाठी अनमोल ठेवा.
सुधाताई…आज भाऊंच्या स्मृतीनिमित्ताने या सर्व आठवणी जाग्या झाल्या. आपणांस यापुढेही कार्य करण्यास अश्वत्थामाभाऊंची सावली लाभो हीच मंगलकामना.... आणि स्व. भाऊंना विनम्र अभिवादन…!💐🙏
*सौ.वैशाली उत्तम अंड्रस्कर, चंद्रपूर*
*कवयित्री/लेखिका*
*©सहप्रशासक/मुख्य परीक्षक/संकलक*
*©मराठीचे शिलेदार समूह*
*दि. २३/०५/२०२३*