‘उंबरठ्याच्या आतली घुसमट’; सविता पाटील ठाकरे

‘उंबरठ्याच्या आतली घुसमट’; सविता पाटील ठाकरेपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेतील परीक्षण

खरे सांगायचे म्हणजे, ‘जिथे प्रेम आहे’, तिथे काही तासांवर दुसऱ्यांचीही हुकमत असते. मध्यरात्रीनंतरचे तास आपल्या हातात नसतात. त्यांच्यावर आठवणींची, विचारांची, शरीराची, प्रेमाची, वासनेची हुकमत असते. लैंगिक घुसमट होणा-यांची मध्यरात्रीनंतर अवस्था बेचैन करणारी असते. विषय मोठा गहन असला तरी त्याची व्याप्ती न संपणारी, न मिटणारी आहे. उंबरठ्याच्या आत असलेल्या बायकांचे जीवन, बायकांच्या जगात त्रास देणारे पुरुष तसेच स्त्रियांचे अभावग्रस्त जगणे हीच खरी ‘घुसमट’ आहे. नमाजाच्या मधल्या वेळातच जगणे व जीवन- मृत्यूचे सोहळे तसेच घरासाठी राबणे यात लैंगिकतेचा विचारही न करता येणे अशा अनेक स्त्रियांची घुसमट सर्वत्र आहे. आता हेच बघा ना..!!

वहिनी, ए वहिनी…!! वहिनी म्हणून की रजनी म्हणू गं तुला?. खरंतर तू वहिनी नंतर,आधी माझ्यासाठी तू माझी रजनीच..! माझी बालमैत्रीण, खास मैत्रीण,आपण एकत्र खेळलो, मोठ्या झालो अन् होय माझ्याच आग्रहाखातर तू होकार देऊन दादाची धर्मपत्नी बनलीस, किती सुखाचा संसार होता ग तुमचा..! सारं काही सुरळीत होतं,पण एखाद्या चक्रीवादळाने जसं सारं उन्मळून पडतं, तसं होत्याचं नव्हतं झालं तुझ्या संसाराचं. तुझं ते कोरं कपाळ, तुझी घुसमट मी पाहते,तुझी नणंद म्हणून नव्हे तर तुझी सखी बनून. तुझ्या डोळ्यातले आसवेच सांगतात, की तुझ्या रक्ताचं पाणी कसं होतंय ते.

नशिबानं…..नशिबानं घाला घातला आणि तुझ्या कपाळाचं कुंकू पुसलं गेलं. नशीब…असं कसं ग रुसलं? देश सेवेसाठी दादाचे बलिदान तुला पोरकं करून गेलं. किती… किती ग स्वप्न पाहिलेली होती तुम्ही आणि आम्ही पण.पण सारं काही अगदी सारच जणू ओरबाडून घेतले तुझ्याकडून. तुमच्या संसार वेलीवरचे पुष्प अजून उमजलेलंही नाही त्या आधीच त्या जीवाला बाप पारखा झालाय. मला कळतं ग सखी. संसाराचं एक चाक निखळलं की त्या गाड्याची होणारी फरफट. “आनंदाच्या सड्यातच राहायची सवय असताना कसा ओढशील ग तू संसाराचा गाडा आणि तोही एकटीच.
तुझी ती घुसमट…! निरागस चेहऱ्यावर दिसते, मनातील खोल दुःख जरी; तू हृदयात लपवतेस. ‘आम्ही सारे’ आहोत गं तुझ्या सोबत, पण काही संकटे अशी असतात ती स्वतःच भोगावी लागतात, सोसावी लागतात, सहन करावी लागतात.

तुझ्यावरचे हे संकट तर तुझ्या जीवनाच्या वाटेवरचा आधारवड नष्ट झाल्याचे आहे,.कसं? कसं सहन करशील तू? मनातली घुसमट वाढली की, जीव गुदमरायला लागतो. तेव्हा जप स्वतःला किमान त्या निष्पाप जीवासाठी. सखी माझीही अवस्था खूप वाईटच आहे. या वेदनेच्या सुखाशी, उगीचच असतो अबोला! ‘घुसमट अंतर्मनाची’ सांगावी कशी कुणाला? ज्या कुटुंबात सुसंवाद नाही, शिस्तीच्या नावाखाली व्यक्तिमत्त्वाची गळचेपी होते, घुसमट होते, तिथे मध्यरात्री नंतरचे तास बेचैन करणारेच असतात. या बाहेर पडणा-या घुसमटीवर उपाय शोधल्यानेच आयुष्यातील काही तास सुसह्य होतील अशी आशा वाटते.

‘घुसमट…… नव्या नवरीची सासरी गेल्यावर स्वतःला जुळवून घेताना होते ती. घुसमट…आयुष्याच्या शेवटच्या क्षणी आपण कुणालाच नको वाटतो तेव्हा होते ती. घुसमट…..इतरांच्या मनासारखं व्हावं म्हणून स्वतःला नको असतानाही समायोजित व्हावं लागतं ती. घुसमट….. स्वतःचे स्थान अबाधित राहण्यासाठी, मनाला मुरड घालून इतरांच्या हसण्यात स्वतःलाही हसावं लागतं ती घुसमट….स्वतःच्या प्रेमाला तिलांजली देऊन नवा संसार रचताना त्याच्या बंधनाखाली स्वतःला झुकावं लागत ती. घुसमट.. आई-वडिलांच्या स्वप्न पूर्ततेसाठी नको असलेल्या शैक्षणिक वाटेवर अंधारात चाचपडणाऱ्या मुलामुलींची होते ती.

आज बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धेसाठी ‘मराठीचे शिलेदार’ समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सरांनी ‘घुसमट’ हा विषय दिला. दिवसभरात अनेकांनी आपल्या काव्य ओंजळीने ‘घुसमट’ या विषयाला पूर्णतः न्याय देण्याचा प्रयत्न केला. एकाहून एक सुंदर अशा रचना साकारल्यात.

परीक्षणार्थ रचना वाचताना… संसाराच्या चक्रात अडकलेल्या स्त्रीची घुसमट वाचली. मनातली घुसमट विठ्ठलाला अर्जव करतांना हृदयाला स्पर्शून गेली. व्यसनात गुंतलेली बुद्धिमत्ता पाहून झालेली घुसमट काळजाला निशब्द करून गेली. पती विरहाची घुसमट आणि त्यात “तुझ्या बदल्यात त्याच्यासह मीच पुढे टाकला असता पाय” वा!! भावना आविष्काराची ही खरी उंची ठरली. जसे कुंपणच शेत खाते तसे अडाणी नेत्यांची मुले रातोरात लखपती होणारच, आपली मात्र घुसमट होणार काय करावे ? असा प्रश्न माझ्यापुढेही उभा राहीला. बळीराजाची घुसमट तर पाचवीलाच पुजलेली, सोबतच डोंगरासारख्या निश्चल बापाची घुसमट अप्रतिम शब्दबद्ध केलेली मी पाहिली. एकंदरीत सर्वच रचनांमध्ये विविधता पहावयास मिळाली. तेव्हा तुम्हा सर्व कवी, कवयित्रींचे खूप खूप अभिनंदन आणि लेखणीस भरभरून शुभेच्छा.

सविता पाटील ठाकरे, सिलवासा
मुख्य परीक्षक/प्रशासक/ कवयित्री/ लेखिका
©मराठीचे शिलेदार समूह

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles