अहिल्या ते अहिल्यादेवी..

अहिल्या ते अहिल्यादेवीपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

माणकोजींच्या पोटी
माणिक जन्मा आले
अहिल्या तिचे नाव
चौंडी गाव धन्य झाले..१

आठ वर्षाची पाहता
चुणचुणीत ती पोर
सून म्हणून निवडती
मल्हारराव होळकर..२

केले तिजला निपुण
दिले राज्यकारभाराचे धडे
तरबेज ती बुद्धीने
कुशल अहिल्या घडे…३

कुम्हेरीच्या लढाईत
पती खंडेराव धारातीर्थी
ऐकून ती खिन्न वार्ता
निघाली होण्या सती..४

नको राज्य करू पोरके
मल्हारराव विनवती
करून विचार सारासार
पाऊले माघारी वळती..५

झाली प्रजेची ती माता
दिव्य तेजाची मूर्ती
सैन्य नेतृत्वास पुढे
जग गाऊ लागले किर्ती..६

काशी ते जगन्नाथपुरी
अवघ्या भारतभर
घाट, अन्नछत्र, धर्मशाळा
पाणपोई अन् मंदिर
विहीरी, तलाव, किल्ले
अन् घातली रस्त्यांचीही भर..७

उध्वस्त मंदिरांचाही
केला जीर्णोद्धार
निमित्त हेची करुनी
दिला लोकांना रोजगार…८

संस्कृती जपण्या सदैव
माता होती दक्ष
वास्तुकला नि शिल्प
देत आहेत उभे साक्ष..९

ऐकली गा-हाणी
निःपक्ष न्यायही केला
दत्तकपुत्र असो वा विधवा
हक्क मिळवुनी दिला..१०

रामायण महाभारतातील
किती दाखले दिले
नका जाऊ तुम्ही सती
समाजमन तिने वळविले..११

काव्य, संगीत, कला यांची
ठेवली ना उणीव
कितीकांना आश्रय दिला
वाढवण्या कलागुण..१२

पंडित असो वा शास्त्री
केला विद्वानांचा आदर
लाभुनी राजाश्रय
झळकत होते माहेश्वर..१३

उभारल्या शाळा नि
केला विद्याप्रसार
ती मानवतेची संत
मान्य करती इतिहासकार..१४

घेतला ना शेतीकर
उभा केला शेतकरी
सामान्य जनतेसोबतच
खुश होता व्यापारी…१५

चोर, दरोडेखोर
यांची थांबवली लूटमार
करूनी मतपरिवर्तन
दिला त्यांनाही रोजगार..१६

कुणा वाटली संत
कुणा वाटते देवी
किती वर्णावी महती
गाथा कर्तृत्वाची गावी..१७

एक छोटी अहिल्या ते
अहिल्यादेवी हा प्रवास
खचितच नव्हता सोपा,
तो होता अखंड ध्यास…१८

प्राणपणाने जपले राज्य,
होता कुढीत जोवर श्वास
साहिल्या किती वेदना,
अन् सोसला किती वनवास…१९

सदा पाहिले लोकहित,
जरी आयुष्य रणांगण
समिधा केली स्व-भावनांची,
चालवण्या प्रशासन…२०

अखंड हिंदुस्तान,
या माऊलीची कर्मभूमी…
उदारमतवादी, तत्वज्ञानी,
पुण्यश्लोक कर्मयोगिनी..
राजमाता अहिल्यादेवी
हा नाद गुंजतो मनी..
हा नाद गुंजतो मनी..!२१

स्वाती मराडे, इंदापूर पुणे
=======

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles