
लहानपण
मी २०११ साली इ. पहिलीच्या वर्गाला शिकवायला होते. मी कायम इ. चौथीचे वर्ग घेतलेले. कायम स्कॉलरशिप व टी. म. वी. चे वर्ग घेतलेले. मला या लहान मुलांचा अनुभव नव्हता. त्यावर्षी मे मध्ये मी अमेरिकेला गेले होते. तेथून येताना मी लहान मुलांसाठी छान स्टिकर, चॉकलेट, टीचिंग साहित्य आणले होते. जूनचा पहिला दिवस शाळेचा लहान मुले बसली. प्रार्थना झाली. मुलांची चुळबुळ सुरु झाली.शांतता नाही. मला काही सुचेना. मुलांना चॉकलेट दिले. ती खूष झाली. परत इकडे तिकडे धावायला लागली. त्यांना ओळीत बसवले. स्कूलबॅग ठेवून घेतल्या. आता जरा मला बरे वाटले.
दिवस यातच संपला. असे काही दिवस झाले. मुले ओळखीची झाली. मुलांना बाई ओळखीच्या, आपुलकीच्या वाटू लागल्या. आता जरा आम्ही रूळलो.गप्पा गोष्टीत मुले रमू लागली. आता लेखन चालू केले.मला मोठया मुलांची सवय होती. ती मुले छान लिहायची मला हवे तसे. मी सराव करून घ्यायची.पण ही लहान मुले कशी हाताळावित हे समजत नव्हते. मी स्टिकर आणले होते. ते स्टिकर द्यायला सुरुवात केली. जो अक्षर छान काढेल त्याला ते बक्षीस देणे चालू केले.
एक स्वप्नील नावाचा मुलगा होता तो खुशालचेंडू होता.त्याला आपण काही बोलायचे नाही. बोलले तरी तो स्वतः त्याला शिक्षा करून घेत असे.मला समजेना हा असा का वागतो? पालकांना विचारले असता काही गोष्टी समोर आल्या. घरात शिक्षा होते मोठ्या मुलांना तो ते पाहायचा,त्या मुळे तो स्वतःला शिक्षा द्यायचा. तो लेखन करायचा पण अक्षर छान काढत नव्हता.त्याला सहज मी टपली मारली. म्हटले अक्षर छान काढ. त्याने सरळ दफ्तर घेतले वर्गबाहेर बसला. त्याने त्याला शिक्षा करून घेतली. पण लक्ष सर्व वर्गात काय चाललेय याकडे होते.
मी जो मुलगा / मुलगी छान अक्षर काढतील त्यांना चॉकलेट व स्टिकर देत होते. हे पाहून तो वर्गात आला. स्टिकर, चॉकलेट मागायला लागला. मी दिले नाही. तो खूप रडायला लागला. नेमकी शाळा सुटली. पालक पाहत होते. हा रडत होता. मी त्याला हवे ते दिलेच नाही. पालक बोलले बाई देऊन टाका न. पण मी दिले नाही. जरा मन दुखावत होते पण मनाला समजावले आज जरा खंबीर राहूया.त्याचे बाबा आले. त्याला घेऊन गेले.रडत होता स्वप्नील. मी घरी गेले. त्याच्या बाबांना फोन केला. “काय हो स्वप्नील बरा आहे का?”मला चैन पडेना…. ते म्हणाले “बाई, तुम्ही निवांत रहा.उद्या त्याच्यातील बदल पहा ”
दुस-या दिवशी बाबांच्या हाताला धरून आला. मी त्याला आणायला गेले… आणि त्याने “Good mirning बाई, बघा आज तुमच्या कडून मी दहा चॉकलेट, दहा स्टिकर घेऊन दाखवतो कि नाही बघाच ” मी अवाक झाले. खूष झाले. बाबा मी दोघे हसलो. वर्ग सुरु झाले. गाणी झाली, लेखन सुरु झाले. आणि काय आश्चर्य आज स्वप्नील खूप आनंदी दिसत होता. अक्षर तर खूपच छान काढत होता. मला बोलला” बाई, अक्षर छान आलय का? ” मी त्याला जवळ घेतले.. कालच्या माझ्या वागण्या बद्दल सॉरी बोलले.
मला म्हणतो कसा ” बाई जाऊद्या हो. मला माझी चूक समजली. तुमच्या मुळे मी अक्षर छान काढायला शिकलो. ” लहान मूल एवढे समंजस कसे याचे आश्चर्य वाटले. आणि मी खूष होऊन त्याला चॉकलेट, स्टिकर दिले.. तो नाचू लागला.
त्या दिवशी तब्बल ९ स्टिकर, चॉकलेट त्याने घेतले. त्या दिवसापासून त्याने अक्षर कधीच घाणेरडे काढले नाही. आजही तो १० वीत आहे. पण भेटला की बाई तुमच्यामुळे माझे अक्षर खूप सुंदर झालेय सर्व शिक्षक माझ्या वर खूष असतात. मला अक्षरासाठी शाबासकी देतात. मला खूप आनंद होतो. असा माझा स्वप्नील आजही माझ्या मनात खोलवर बसलेला आहे. पहिलीचा वर्ग हाताळायची सवय झाली. नवे अनुभव येत होते. मजा घेत होते.
वसुधा नाईक, पुणे
=========