
बंध सोबतीचे
एकमेकांच्या भावनांचा
आदर करावा नेहमी,
कुणास ठाऊक कोण कधी
येईल आपल्या कामी..
सगळेच असतात बरोबर
आपापल्या जागी,
का करावी मतभेदाची
भिंत मधेच ऊभी..
माणूसच लागतो सांत्वन
करायला दुःखाच्या समयी,
क्षणभर का होईना
तोच स्मरतो हृदयी..
असतात सर्व मग्न
आपापल्या व्यापात,
तरी आठवणी जपतात
अंतरीच्या कप्प्यात ..
हे विश्व किती अनाकलनीय
अनंत आणि व्यापक,
अपेक्षा असाव्या नेहमी
साध्या आणि माफक ..
आयुष्याच्या वाटेवर असे हो
सुखदुःखाची छाया,
आपलेच असतात ते सारे
जे लावतात अपार माया..
सगेसोयरे,मित्रपरिवार
जपावी अंतःकरणात नाती,
सवे सर्वांच्या चालताना
का बाळगावी व्यर्थ भिती?..
प्रगतीच्या दिशेने जाताना
विसरू नये सोबत्यांना,
शक्य असेल तेथे हात
मदतीचा द्यावा तयांना ..
साथसोबतीचा प्रवास
होईल सुखरूप सारा,
अंधाऱ्या वाटेवरही
दीप उजळेल न्यारा..
मागावे तरी आता
काय तुझ्याकडे देवा?
आजन्म राहो आपलेपणा
हाच अनमोल ठेवा..
ऋणानुबंधाच्या गाठी
अतूट रहाव्यात सदा
हृदयी प्रेम वसावे
हेच दे आशिर्वादा.
हेच दे आशिर्वादा..
हेच दे आशिर्वादा..
पांडुरंग एकनाथ घोलप
ता.कर्जत,जि.रायगड
======