
‘लव्ह यू डियर’, डॉ अनिल पावशेकर
*_गो फॉर गोरेवाडा भाग क्र ५_*
बाळासाहेब ठाकरे, गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान, नागपूर इथे हर्बीवोर सफारी करिता चाळीस हेक्टर भूभाग आरक्षित आहे. यांत सर्वाधिक संख्या आहे ती स्पॉटेड डियर अर्थातच ठिपक्यांच्या हरणांची.चला तर मग डियर सफारीला. ‘मज आणुनी द्या ते हरीण अयोध्यानाथा’ हा सीतामाईने प्रभू श्रीरामांजवळ केलेला सुवर्णमृगाचा लाडीवाळ हट्ट सर्व परिचित आहे. विटकरी कातडीवर पांढरे ठिपके (स्पॉटेड डियर) अतिसुंदर डोळ्यांचा आणि पाहता क्षणीच कोणीही मोहात पडावे असा लोभस प्राणी म्हणजे हरीण. याची सुंदरता काय वर्णावी, हरीणांचे डोळे एवढे सुरेख असतात की एखाद्या सुंदर डोळ्यांच्या स्त्री ला हरीणाक्षी, मृगनयनी असे म्हटले जाते.
वास्तविकत: हरणांचा उल्लेख प्राचीन गुहांतील चित्रांपासून इतिहासातात, पौराणिक, धार्मिक कथा आणि साहित्यात आढळतो. हरीणांचे दोन मुख्य उपकुळे म्हणजे सारंग हरणे (सर्व्हीडी) आणि कुरंग हरणे(ॲंटीलोप) ही होय. जगभर असणाऱ्या १८० जातींतील दहा सारंग जाती आणि सहा कुरंग जातींची हरणे भारत, तिबेट, नेपाळ, भूतान इथे आढळतात. भारतात चितळ,सांबर,बारासिंगा, काश्मिरी हंगुल, मणिपुरी संगई, दरडा, कस्तूरी मृग, सिक्कीम शाऊ, पिसोरी आणि पाडा ही सारंग हरणे आढळतात तर चौसिंगा, नीलगाय, काळवीट चिंकारा, गोआ, तिबेटी चीक ही कुरंग हरणे आढळतात.
चितळ हे भारतात सर्वाधिक आढळणारे सारंग हरीण आहे. सारंग हरणाला दरवर्षी नवे शिंग येतात. प्रथम त्यावर मखमली आवरण असते, हळूहळू वाळून त्याचे पोपडे पडतात. यांच्या शिंगांना फांद्यांसारखी इतर शिंगे फुटलेली दिसतात. सारंग कुळात फक्त नरांनाच शिंगे असतात. हरणांच्या पायांना विभागलेले खूर असतात. मध्य भारतात विशेषतः कान्हा, बांधवगड इथे चितळांची संख्या लक्षणीय आहे. खुरटी जंगले, माळराण, गवताळ कुरणे ही हरणांचे नैसर्गिक अधिवास असून ते मोठ्या झाडांखाली कळपाने राहतात. कोवळे लुसलुशीत गवत, कोवळा झाडपाला, शेतातील पिकांची पाने, शेंगा हे त्यांचे आवडते खाद्य होय.
हरीणांचे सरासरी आयुर्मान दहा ते पंधरा वर्षांचे असते. वजन साधारणतः तीस ते पंच्याहत्तर किलो इतके तर आकार १.७ मीटर इतका असू शकतो. उंचीने शेळी बकरीपेक्षा थोडे जास्त, तोंड निमुळते , दोन उभे कान, लहान शेपटी आणि चार काटकुळे पाय असतात. हरीणांची श्रवण आणि गंध क्षमता तीव्र असते आणि रात्रीची दृष्टी उत्तम असते. हरीण चांगले पोहू शकतात तसेच लांब उडी मारू शकतात. हरणे वेगाने धावतांना सुद्धा त्यात एक कौशल्य असते. धावत धावत वेगात लगेच वळणे घेऊन दिशा बदलतात. हरणांचा रंग ॠतूनुसार बदलतो. पावसाळा आणि हिवाळ्यात गडद तर उन्हाळ्यात रंग फिका पडतो.
हरणाचे बछडे जन्मल्यानंतर तासभरातच उठून चालण्याचा प्रयत्न करू लागते आणि दोन आठवड्यात गवत खाण्यास सुरुवात करते. हरीण एकावेळी एकाच बछड्याला जन्म देतो. क्वचितच दोन बछडे जन्माला येतात. हरणांच्या बछड्यांच्या अंगाला हरीणाच्या अंगासारखा वास नसतो. हा गंध नसल्याने वाघ, बिबट, रानकुत्र्यांसारख्या शिकारी प्राण्यांपासून त्यांचे रक्षण होते. हरणांच्या डोळ्यांची रचना अशी असते की त्यांना खूप रूंद असा परिसर सहज न्याहाळता येतो. शिकाऱ्यांपासून रक्षण करण्यासाठी हरीण पाणी पितांना काही हरणे उभे राहून, सभोवार सावध नजर फिरवून एकमेकांना संकेत देतात.
आखीवरेखीव, बांधेसूद, देखणा आणि चपळ असलेला हा प्राणी स्वभावाने गरीब, घाबरट असतो. तरीपण त्याच्या नजरेत दिसणारी निरागसता आणि करूणा आपल्या मनाचा ठाव घेते. अतिशय सुंदर झळाळणाऱ्या कातडीचा, विविध प्रकारच्या शिंगांचा, सोनेरी, पिवळ्या, लालसर रंगाचा आणि अंगभर पांढऱ्या ठिपक्यांचा हा प्राणी सहजच आपले लक्ष वेधून घेतो. सकाळच्या कोवळ्या उन्हात आणि सायंकाळच्या सोनेरी उन्हात यांच्यावरून नजर हटत नाही. सारखे पाहतच रहावे वाटते. कितीही पाहिले तरी समाधान होत नाही. त्यातही हरीणांचे गोजिरवाणे बछडे पाहून त्यांना लगेच उचलून घ्यावे किंवा मनसोक्त बिलगावे आणि म्हणावे वाटते,, लव्ह यू डियर!
(क्रमशः,,,)
दि. १८ जून २०२३
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com