
‘आशाच फक्तःजीवन संजीवनी’; वृंदा करमरकर
*_सोमवारीय त्रिवेणी काव्यस्पर्धेचे परीक्षण_*
ँ
‘एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे’ या गीताप्रमाणे जीवन हे सुखदुःखाच्या धाग्यांनी विणलेले वस्त्र आहे. आशा आणि निराशेच्या झुल्यावर माणूस झोके घेत असतो.
भिन्न काळ्या मेघांनाही
सोनरुपेरी किनार आहे
जीवनसंग्रामातही आशेचा आधार आहे
खरंच चहुबाजूंनी संकटांचा भडीमार सुरु असतो. सगळीकडं काळा अंधार पसरलेला आहे. अशा परिस्थितीत जगण्याची उमेदही संपलेली आहे. पण अशावेळी एखादा आशादायक विचार मनी येतो आणि मन आनंदी होतं. हीच आशा.. निसर्गाने मानवाला दिलेली देणगी. अगदी सध्याच्या परिस्थितीचा विचार केला, तरी काहीशी अशीच स्थिती आहे. पावसाने ओढ दिली आहे. जून संपत आला तरी, मेघुटाचं दर्शन नाही. कोरडं आभाळ आणि बळीराजाचे अश्रूंनी भरलेले डोळे. पाऊस पडेल कि, नाही कळत नाही. अशावेळी त्याची कारभारीण त्याला सांगते “देव दयाळू आहे. पाऊस नक्कीच पडेल, कशाला हिंमत हरायची.” या शब्दांनी त्याच्या मनी आशा जागते. फक्त त्या आशेच्या बळावर हिंमतीनं शेती कसतो. अर्थात पीक पदरी पडेल का? हे दैवाधीन असते.
खरंच असं वाटतं, माणूस नियतीच्या हातचं बाहुलं आहे. आशाच फक्त त्याच्या हातात आहे. बाकी सारं दैवाधीन. माणूस आनंदानं कुठं प्रवासाला जायचं ठरवतो….सगळी
तयारी करतो. त्याला आशा असते आपण वेळेवर पोहोचणार, आपलं काम होणार, पण अचानक रेल्वेचा अपघात होतो. सारं काही नष्ट होतं.म्हणजे माणूस नियतीच्या हातचं खेळणंच ठरतो. सारं इतकं अशाश्वत असलं तरी, जगणं का सोडायचं. नव्या दमानं, नव्या जोमानं आशेचा किरण मनी ठेवून जगायचं. आपल्या प्रयत्नांवर विश्वास ठेवून सकारात्मक विचार करायचा. किमान आशातरी आपल्या जवळ असतेच. जसे माणूस भर उन्हात ,रणरणत्या उन्हात चालत असताना त्याची सावली त्याची साथ सोडत नाही. तशीच आशा माणसा बरोबर सदैव असते, म्हणूनच तो नव्या उमेदीने यशाचा मार्ग आक्रमत असतो.
सारा परिसर उदासानतेने झाकोळला
फुलांचा ऋतूच कसा कोमेजलेला
मी चाललोय सोबत माझ्या आशाच फक्त
अजून एक गोष्ट सांगायला हवी. सीमेवर रात्रंदिवस आपले जवान तैनात असतात. त्यांचा रोज मृत्यूशी सामनाअसतो. यावेळी आमच्या ओळखीच्या ममताला दिवाळी वेळी
विशेष आनंद झालेला असतो. साऱ्यांना ती आनंदानं सांगत होती. तिचा पती आठ दहा माहिन्यानंतर यंदा दिवाळीला येणार होता. घरी खूप तयारी केली होती, सासूबाईंच्या मदतीने. पती यायला फक्त पाच-सहा दिवस होते. तो लडाख सीमेवर तैनात होता. ममता नं खूप स्वप्नं पाहिली होती. तिच्या इवल्या दोन पिल्लांना, पण बाबाला भेटण्याची तीव्र इच्छा होती. आणि दोन दिवसांपूर्वी पतीऐवजी ती बातमी आली, जीवघेणी. तिचा पती शहिद झाला होता, शत्रूशी लढताना. ममताच्या स्वप्नांचा चुराडा झाला. ज्या फक्त आशेवर तिनं एवढे महिने एकटीने संसार पेलला त्याचं काय? नियतीनं असा डाव साधला. काय आहे आपल्या हातात? फक्त आशाच..! अशा घटनांनी मन विषण्ण होतं. अजूनही त्या बिचाऱ्या ममताला आशा आहे; ती बातमी खोटी ठरेल. तिचा पती परतून येईल…….. तिचं दुःख या त्रिवेणीतून व्यक्त होतंय…..!
तारेवर शहिद सैनिकाचे
ओले कपडे घातले आहेत
त्यातून जणू रक्ताचे थेंब ठिबकत आहेत
तो परतायची आशाच फक्त तिला. अजून वाटतं पती परतेल. म्हणून रोज त्याचे कपडे धुते, वाळत घालते. यापुढंही तिच्यासवे फक्त आशाच असेल, जी तिला जगायला बळ देईल. अर्थात हे चूक की, बरोबर माहित नाही. पण सद्य परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रत्येकजण असाच फक्त आशेचा सहारा घेतो. “फक्त आशाच आहे, जी जगण्याला देते उर्जा, फक्त आशेच्या मदतीने माणूस संकटांशी दोन हात करतो……..मग आशेला ‘जीवन संजीवनी’ म्हणणं योग्यच ठरेल.”
वृंदा(चित्रा)करमरकर
मुख्य मार्गदर्शक परीक्षक,सहप्रशासक
सांगली, जिल्हा सांगली
©मराठीचे शिलेदार समूह