
‘पंचगव्य चिकित्सा कार्यशाळा’ सर्व वैद्यकीय शाखांनी घेतला सहभाग
अमृता खाकुर्डीकर, पुणे
पुणे: येथील आयुर्वेद व निसर्गोपचार क्षेत्रात भरीव काम करून त्यासंबंधीत विविध उपक्रम आयोजित करणा-या “जनमित्र सेवा संघ” यां संस्थेच्या वतीने एका ‘पंचगव्य चिकित्सा’ या विषयावरील कार्यशाळेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.
पंचगव्य चिकित्सेतील गुजरातचे सुप्रसिद्ध तज्ज्ञ डॉ. हितेश जानी हे या महत्वपूर्ण कार्यशाळेस मुख्य मार्गदर्शक म्हणून लाभले होते. अष्टांग आयुर्वेद महाविद्यालयातीचे प्राचार्य व ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य परांजपे व वैद्य सौ.परांजपे यांची कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती.
आयुर्वेदिक उपचारासंबंधीत असलेल्या या कार्यशाळेत आयुर्वेदाबरोबरच ॲलोपॅथी, होमिओपॅथी आणि निसर्गोपचार अशा सर्व पॅथींच्या माध्यमातून ऋग्णावर उपचार करणारे व्यावसायिक तसेच वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी यांनी यात खास सहभाग नोंदवला. कार्यशाळेच्या मुख्य सत्रात जनमित्र सेवा संघाचे डॉ. दिलीप कुलकर्णी यांनी ” पंचगव्य आणि ओझोन ” या मौलीक उपचार पद्धतीची माहिती देऊन त्याची उपयुक्तता स्पष्ट केली.
सर्व वैद्यकीय शाखांना समाविष्ट करून सर्व पॅथींमध्ये पंचगव्य उपचार पध्दतीच्या वापराबाबत विचारमंथन करणारी ही पहिलीच कार्यशाळा ठरली, अशा शब्दात सहभागींनी या उपक्रमाबाबत आपला अभिप्राय नोंदवला. आयुर्वेद व निसर्गोपचार क्षेत्रातील विविध मान्यवर प्रतिष्ठांनी कार्यशाळेस उपस्थित राहून चांगला प्रतिसाद दिला.’जनमित्र’च्या उपाध्यक्ष डॉ.अनुजा कुलकर्णी यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. ‘जनमित्र’ संघाचे कोषाध्यक्ष श्री.काशिनाथ थिटे,सदस्य डॉ.स्वाती लढ्ढा, डॉ.अमोल जावडेकर यांनी कार्यशाळा यशस्वी करण्यास विशेष परीश्रम घेतले.