
किल्ले सिंधुदुर्ग
सागरी मार्गावरील शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी शिवरायांनी जलदुर्ग बांधले. त्यातीलच एक म्हणजे सिंधुदुर्ग. मालवण बंदरापासून १.६ किमी अंतरावर अरबी समुद्रात मालवणच्या कुरटे बेटावर इ.स. १६६४ मध्ये हिरोजी इंदुलकर यांनी या किल्ल्याच्या बांधकामास सुरुवात केली. याचे एकूण क्षेत्रफळ ४५ एकर आहे. हे शिवरायांचे आरमार दलाचे आद्यस्थान. या किल्ल्याचे बांधकाम ३ वर्ष चालले.
या किल्ल्यावर एकूण ५२ बुरुज उभारण्यात आले. किल्ल्याभोवती बांधलेल्या तटाची उंची ३० फूट व रूंदी १२ फूट अशी भक्कम बांधणी होती.
किल्ल्यावर गेल्यावर पहिल्यांदा पहायला मिळतो तो दुर्गाचा दरवाजा, म्हणजे किल्ल्याचे प्रवेशद्वार जे उंबराच्या लाकडापासून बनवले आहे व त्यास सागाच्या लाकडाची जोड दिली आहे. प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर महाद्वाराच्या तटबंदीच्या भिंतीला उजव्या बाजूला दोन दिवळ्या आहेत. त्यातील एका दिवळीत शिवाजी महाराजांच्या डाव्या पायाचा ठसा व दुसऱ्या दिवळीत उजव्या हाताचा ठसा आहे असे म्हटले जाते. इ.स. १६९५ मध्ये राजाराम महाराजांनी शिवछत्रपतींचे बांधलेले मंदिर येथे पहायला मिळते. शिवराजेश्वर मंदिरात शिवाजी महाराजांची बसलेली मूर्ती पहायला मिळते. मंदिरापासून जवळच एक सभागृह आहे.
१९०७ मध्ये कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी याचे बांधकाम केले. याशिवाय किल्ल्यावर द्वार रक्षक हनुमंत, महादेव, भगवती, महापुरुष यांची मंदिरे आहेत. शिवमंदिरात शिवलिंगासोबतच एक भुयार आहे. किल्ल्यावर काही संकट आल्यास, शत्रूने ताबा मिळवल्यास येथून सुखरूप बाहेर पडता यावे यासाठी ही योजना होती. किल्ल्याचे बुरुज अजूनही येथे पहायला मिळतात. त्यावर चढून आजूबाजूला असलेले निसर्ग सौंदर्य अनुभवता येते. किल्ल्याच्या सभोवती खा-या पाण्याचा समुद्र असला तरी किल्ल्यामध्ये दूधबाव, दहीबाव व साखरबाव या गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत. किल्ल्यावर ४५ मजबूत जिने आहेत. तटबंदीमध्ये ३५-४० शौचालय देखील बांधलेली आहेत.
किल्ल्यापासून अर्धा किलोमीटर अंतरावर सुनामी बेट आहे.या ठिकाणी स्पीड बोट, वाटर स्कूटर, बम्पर बोट, जेट स्की इ. चा आनंद घेता येतो. २.२ किलोमीटर अंतरावर कराली नदी समुद्राला मिळते तेथे बॅकवाॅटरमध्येही बोटींगचा आनंद घेता येतो. किल्ल्यापासून १० किमी अंतरावर तारकर्ली बीच आहे. अतिशय सुंदर असणा-या या बीचवरुन सुर्यास्ताची मनमोहक व आश्चर्यचकित करणारी दृश्ये पाहता येतात. येथे जाण्यासाठी रेल्वे अथवा बसने सिंधुदुर्ग पर्यंत जाता येते. विमानाने गोवा येथे जाऊन तिथून रस्ते मार्गाने पोहचता येते. प्रत्यक्ष किल्ल्यावर जाण्यासाठी होडी मधून जावे लागते.
स्वाती मराडे, इंदापूर जि.पुणे
=======