
आज विरोधकांची पाटणा येथे बैठक; मिशन लोकसभेसाठी वज्रमूठ बांधणार
पाटणा: आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुका आता अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या निवडणुकांसाठी विरोधी पक्षांनी तयारीला सुरूवात केली आहे. याचाच भाग म्हणून शुक्रवार 23 जूनला विरोधकांची बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वात पाटण्यामध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत सर्व विरोधक मिशन लोकसभेंतर्गत वज्रमूठ बांधण्याची शक्यता आहे.
या बैठकीला देशभरातले बडे नेते सहभागी होणार आहेत. विरोधी पक्षांच्या या बैठकीला काँग्रेस प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, उद्धव ठाकरे, शरद पवार, तामीळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टालिन, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, सीपीआय महासचिव डी राजा, सीपीएम नेते सीताराम येचुरी आणि दीपांकर भट्टाचार्य सामील होणार आहेत.
सुरूवातीला ही बैठक 12 जूनला होणार होती, पण काँग्रेस आणि डीएमकेसह काही पक्षांनी तारीख बदलण्यासाठी आग्रही होत्या, त्यामुळे बैठकीच्या तारखेमध्ये बदल करण्यात आला आहे. या बैठकीमध्ये भाजपचा सामना कसा करायचा, याबाबत रणनीती ठरवली जाणार आहे.