‘नभा शिंपता तू सरी बेधुंद…मोहवितो मनास हा भूगंध…!; वैशाली अंड्रस्कर

‘नभा शिंपता तू सरी बेधुंद…मोहवितो मनास हा भूगंध…!; वैशाली अंड्रस्कर



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

येणार येणार म्हणताना
तो बरसला एकदाचा…
किती आसुसले होते सारे
तनेमने चिंब केली त्याने
मी ही हुंगून घेतला भूगंध
काय तुम्हीही लुटला ना आनंद….!

अवघी सृष्टी ज्या पावसाची वाट बघत होती तो जरा उशिराने का होईना बरसला. कोणी अगदी नवागत तान्हुल्याप्रमाणे त्याला तळहातावर झेललं. कोणी खिडकीतून डोकावून कोसळणाऱ्या सरींना नेत्रात साठवलं….बळीराजाने दोन्ही हात जोडून आभाळाकडे कृतज्ञता व्यक्त केली आणि वदला ‘मायबापा अशीच किरपा राहू दे आम्हांवर.. या मातीचा भूगंध पसरू दे दाही दिशा.. हिरव्यागार रानातून…मोत्यावानी दाण्यातून आणि जिंदगानी करून टाक आबादानी तुझ्या लेकराची…!

खरेतर हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा हे ऋतूचक्र अव्याहतपणे चालू आहे. त्यांतही सहा उपऋतूंचे सहा सोहळे तर भारतीय जनमानस नित्यच साजरे करत असते. पण पावसाळा म्हणजेच वर्षा ऋतूची वाट बघण्यात जी मजा आहे ती आगळीवेगळीच… मरगळलेल्या मनाला आणि उजाडलेल्या रानाला नवचैतन्याची पालवी देणारा हा पहिला पाऊस आला की, माती ओली होते…त्या ओल्या मातीचा सुवास म्हणजेच भूगंध. या भूगंधाची ओढ नसणारी व्यक्ती अपवादात्मकच….तर असा हा ‘भूगंध’ मराठीचे शिलेदार समूहात ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ स्पर्धेच्या निमित्ताने माननीय मुख्य प्रशासक राहुल पाटील यांनी विषय म्हणून दिला आणि शिलेदारांनी आपल्या लेखणीतून समूहाच्या अंगणात अलगत पसरवला. सर्वांचे खूप खूप अभिनंदन…!

पण हा भूगंध नेमका का आणि कसा येतो याचीही उत्सुकता आपल्यातील काही संशोधक मनाला असतेच. या भूगंधाला अर्थात मातीच्या सुगंधाला कारणीभूत असलेला एक जिवाणू म्हणजे स्ट्रॅप्टोमायसीस ( स्पोअर्स ) होय. हा उष्ण तापमानात कठीण कवचधारी पेशींच्या रूपात राहतो. पहिल्या पावसामुळे हे स्पोअर्स हवेत विखुरतात. त्यात जिओस्मिन नावाचे जैवरसायन असते, त्याचाच वास आपल्याला येतो जो मातीचा वास किंवा भूगंध म्हणून आपण ओळखतो.

ते स्ट्रॅप्टोमायसीन, स्पोअर्स, जिओस्मिन आणि ते जैवरसायन…ही जीभ वळवून वळवून उच्चारायची नावे जाऊ द्या. आपल्याला तर फक्त एवढंच ठाऊक पहिला पाऊस आणि मातीचा गंध…भूगंध…कवीमनाला वेड लावणारा, कुठल्याही वयातील माणसाला चिरतरुण राखणारा, प्रियतमेच्या ओल्या बटांना गंधित करणारा आणि दूरदेशीच्या प्रियजनांच्या आठवणींनी छळणारा भूगंध, हिरव्या शिवाराच्या सपानानं बळीराजाला उल्हसित करणारा ओल्या मातीचा भूगंध…या भूगंधाला कुठल्याही अत्तराची तोड नाही….खरे ना….म्हणूनच म्हणावेसे वाटते….’नभा शिंपता तू सरी बेधुंद…मोहवितो मनास हा भूगंध’….!’

✍️सौ.वैशाली उत्तम अंड्रस्कर, चंद्रपूर
कवयित्री/लेखिका
सहप्रशासक/मुख्य परीक्षक/संकलक
©मराठीचे शिलेदार समूह

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,877FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles