किल्ले विजयदुर्ग

किल्ले विजयदुर्गपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील प्राचीन असलेला हा किल्ला म्हणजे विजयदुर्ग. त्याकाळी कोकण प्रांतावर वर्चस्व असणा-या राजा भोज यांनी ११९३-१२०६ या काळात बांधला. या किल्ल्यावर विजयनगरचे सम्राट, बहामनी राजे, आदिलशाह यांनी राज्य केले. १६५३ मध्ये शिवछत्रपतींनी या किल्ल्यावर हल्ला करून हा किल्ला ताब्यात घेतला. त्यापूर्वी हा किल्ला पाच एकर क्षेत्रावर होता. शिवाजी महाराजांनी त्याची तटबंदी वाढवून १७ ते १८ एकर याचा विस्तार केला. याच्या अभेद्यपणामुळे याला ‘पूर्व जिब्राल्टर’ असेही म्हटले जाते. गि-ये गावाजवळ वसलेला असल्याने त्याचे प्राचीन नाव ‘घेरिया’ असेदेखील आहे. सर्व बाजूंनी पाणी असले तरी एका अरूंद रस्त्याने जमिनीशी जोडलेला आहे.

किल्ल्याजवळ वाघोटण खाडी ४० किमी पर्यंत असल्याने शत्रुची मोठी जहाजे तिथे येऊ शकत नसत. मराठा युद्धनौका येथे आरामात जाऊ शकत तरीही समुद्रापासून अंतर जास्त असल्याने दुसऱ्यांना त्या दिसू शकत नव्हत्या‌. किल्ल्यापासून गावातील राजवाडा धुळप येथे जाणारा २०० मीटर लांबीचा समुद्राखालील बोगदा आहे. आता बोगदा अर्धवट ब्लाॅक झाला आहे. किल्ल्यासमोर दुस-या टेकडीवर शत्रूला फसवण्यासाठी भिंत बांधली होती. या भिंतीला लक्ष्य करूनच शत्रूचा दारुगोळा संपत असे.

आपल्याला किल्ल्यामध्ये जाताना हनुमान मंदिर लागते. जे शिवरायांनी किल्ला ताब्यात घेतल्यावर बांधले होते. येथे तिहेरी तटबंदी आढळते.. पहिली समुद्राला लागून असलेली, दुसरी बुरूजाच्या भोवती, तिसरी किल्ल्याच्या भोवती आहे. गोमुखी दरवाजा म्हणजे किल्ल्याचे प्रवेशद्वार. हे प्रवेशद्वार किल्ल्याच्या अगदी जवळ गेल्यावरच दिसते. किल्ल्यातून आत गेल्यावर एक छोटा जिभीचा दरवाजा दिसतो. या किल्ल्यावर खलबतखाना देखील आहे. खलबतखान्याच्या पुढे गेले की ध्वजस्तंभ आहे ज्याचे राज्य त्याचा ध्वज यावर फडकत असे‌. खुबलढा बुरुज हा प्रसिद्ध बुरुज आहे. यावरून शत्रूवर तोफांचा मारा केला जात असे. तसेच शत्रूची टेहेळणी सूद्धा येथून केली जात असे. या बुरुजावर जाण्यासाठी एक भुयारी मार्गही होता. या किल्ल्यावर आपल्याला वेगवेगळ्या गुहा पहायला मिळतात. आतल्या बाजूने एक इमारत आहे जिला सदर असे म्हणतात.
या किल्ल्यावर जाण्यासाठी कणकवली पर्यंत बसने येऊन तिथून किल्ल्यापर्यंत बसने किंवा खाजगी वाहनाने जाता येते. जवळचे रेल्वेस्थानक कणकवली येथे आहे. विमानाने जायचे असल्यास जवळचे विमानतळ रत्नागिरी हे आहे.

स्वाती मराडे, पुणे
सहसंपादक/सहप्रशासक/मुख्य परीक्षक
=======

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,877FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles