
भूगंध..
आज किती दिवसांपासून
वाट बघत होती धरा
त्या पहिल्या सरीची
नखशिखांत भिजली जरा..
इतक्या दिवसांची तृष्णा
भागवली सरेनी धरेची
ओलेचिंब होता सुखावली
अनाहूत ओढ होती तीची..
पावसाच्या सरी नाचतच
काहीशा रुणझुणत आल्या
येताना भूगंध शिंपडून
धरेस मिठी मारुन गेल्या..
त्या भूगंधाचा कस्तुरीगंध
चोहीकडे असा दरवळला
धरेवर मोती उगवणार आता
आनंदोत्सवाने कृषक वेडावला..
मोरपंख फुलवून मयुर
मेघ जेव्हा दाटून येती
मंद गंध मातीचा येता
मनात साठवून घेती..
प्रज्ञा सवदत्ती
गोरेगाव-रायगड.
======