‘आग आगीवर झाली फिदा’; डॉ अनिल पावशेकर

‘आग आगीवर झाली फिदा’; डॉ अनिल पावशेकरपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_गो फॉर गोरेवाडा, अंतिम भाग_

नागपुरातील प्रसिद्ध ‘बाळासाहेब ठाकरे’ गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानात २५ हेक्टर जागा व्याघ्र सफारी करता आरक्षित आहे. कॅप्टीव्ह झू अर्थातच बंदिस्त सफारीच्या या प्रकारात पर्यटक एका बस मधून पर्यटनाचा आनंद घेतात तर राजकुमार नावाचा आठ वर्षांचा वाघ आणि बारा वर्षांची ली नावाची वाघीण मुक्तपणे संचार करत असते. सध्यातरी इथे या जोडागोळीची सत्ता असून दोघांच्या दर्शनाने पर्यटकांचे व्याघ्र सफारीचे पैसे वसूल होतात. जवळपास पंधरा ते वीस मिनिटे या दोघांच्या लीला पाहून गोरेवाडा सफारी सार्थकी लागल्याचे समाधान मिळते.

या व्याघ्र जोडीची कहानी रंजक आहे. असे म्हणतात की राजकुमार नावाच्या वाघाला जंगलापेक्षा भंडारा क्षेत्रातील मानवी वस्तीची ओढ जास्त होती. त्यातही हे महाशय लग्नसमारंभात आवर्जून हजेरी लावायचे. हे प्रकरण इतके वाढले होती की याची स्वारी चक्क स्टेजपर्यंत धडक द्यायची. जणुकाही लग्नसमारंभ बाजूला राहिले आणि यहाँ के हम है राजकुमार म्हणून ऐटीत वावरायचा. याचा हाच बिनधास्तपणा पाहून याचे राजकुमार असे नामकरण करण्यात आले असावे. तर ली ह्या वाघीणीला पहिले रेस्क्यू सेंटर नंतर सफारी भागात दाखल करण्यात आले आहे. खरेतर जंगल सफारीत कितीही सुंदर प्राणी दिसले तरी जोपर्यंत व्याघ्र दर्शन होत नाही तोपर्यंत मनाला हुरहुर लागून राहते. मात्र इथे या युगलाचे मनसोक्त दर्शन घडते.

राजकुमार नावाप्रमाणेच अवाढव्य, ऐटीत चालणारा, रांगडा‌. राजकुमार चे थोडक्यात वर्णन करायचे झाले तर गडी अंगाने उभा नी आडवा, त्याच्या रुपात रानटी गोडवा. तर ली वाघीण त्यामानाने छोट्या आकाराची, शांत. मात्र दोघांचीही गट्टी चांगली जमली होती. जणुकाही तू जहां जहाँ चलेगा, मेरा साया साथ होगा प्रमाणे ली राजकुमारला फॉलो करत होती. या दोघांचा लाडीवाळपणा पाहून प्रेम हे केवळ आंधळं नसतं तर ते कधी कधी रांगडं असतं, जंगली आणि हिंसक सुद्धा असतं वाटू लागतं. हे दोघेही जेंव्हा पर्यटक बस ला खेटून उभे राहतात तेव्हा जीवाचा थरकाप उडतो. पण त्या दोघांनाही बस आणि पर्यटकांशी काही देणं घेणं नसतं. कारण तिकडे आग आगीवर फिदा झाली असते.

वाघ हा मार्जार कुळातील सर्वात मोठा प्राणी असून तो भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. तो नैसर्गिक अन्नसाखळीत सर्वोच्च स्थान भुषवतो. त्याची शिकार क्षमता जबरदस्त असून तो मुख्यत्वे तृणभक्षी प्राण्यांची शिकार करतो. जंगलात वाघ असणे जंगलाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. वाघाच्या भीतीने लाकूडतोडे अथवा जंगलावर अवलंबून असणारे लोक जंगलात जात नाही आणि जंगल सुरक्षित राहते. वाघ नसला तर जंगलांची बेसुमार कत्तल होऊन जंगले लवकर साफ होण्याची तसेच सभोवतालचे तापमान वाढण्याची भीती असते. तृणभक्षींची संख्या आटोक्यात ठेवण्यासाठी, जंगल संपदा अबाधित राखण्यासाठी तसेच जागतिक तापमान नियंत्रित करण्यासाठी व्याघ्र रक्षण, व्याघ्र संवर्धन गरजेचं आहे.

वाघाचे शास्त्रीय नाव पॅंथेरा टायग्रीस असून या प्रजातीची उपलब्धता चिंताजनक आहे ‌. भारतात वाघ संर‌क्षित प्राणी असून त्याची शिकार दंडनीय अपराध आहे. सध्या भारतासहित म्यानमार, थायलंड, चीन आणि रशियात आढळतो‌. वाघांच्या पाच उपप्रजाती असून त्यात इंडोचायनीज वाघ अथवा कोर्बेटी वाघ, मलेशियन वाघ, सुमात्रन वाघ, सायबेरियन वाघ आणि दक्षिण चिनी वाघ यांचा समावेश होतो. तर बाली वाघ, जावन वाघ आणि कॅस्पियन वाघ जवळपास नामशेष झालेले आहेत. मध्य भारतातील पानगळी जंगलांमध्ये वाघांचे सर्वाधिक अस्तित्व आढळते. यांत कान्हा, बांधवगड, मेळघाट, ताडोबा यासारखी राष्ट्रीय उद्याने व अभयारण्य येतात.

सायबेरियन वाघ आकाराने सर्वात मोठा असतो तर भारतीय वाघ त्याच्या तुलनेत छोटा असतो. वाघ पुर्णतः मांसाहारी असून तीक्ष्ण दांत, मजबूत जबडा आणि चपळ शरीर ही त्याची शिकारीची आयुधं आहेत. सांबर, रानगवा, हरणे, नीलगाय, रानडुक्कर यांसारखी मध्यम ते मोठ्या आकाराच्या प्राण्यांची तो शिकार करतो. वाघ पहिले सावज हेरतो, दबा धरून बसतो आणि जास्तीत जास्त जवळ जाऊन सावजावर हल्ला करतो. वाघ शिकार साधल्यावर ती गुहेत किंवा दाट झाडीत लपून ठेवतो कारण अस्वले, तडस, गिधाडे त्यावर टपून बसलेले असतात. शिकार केल्यानंतर भक्ष्यानुसार त्याला तीन ते सात दिवस शिकार पुरते. भक्ष्यातील मांसल भाग खाण्यास वाघ प्राधान्य देतो.

भल्या मोठ्या वाघाला ढाण्या वाघ म्हणतात. भारतीय संस्कृतीत वाघाला आदरयुक्त भीतीचे स्थान आहे. जंगलचा राजा म्हणून ओळख असलेला हा प्राणी जनसामान्यांत शौर्य, राजबिंडेपणा, सौंदर्य आणि राकटतेचे प्रतिक मानले जाते. वाघाला आपल्या संस्कृतीत पार्वतीचा अवतार असलेल्या महिषासुर मर्दिनीचे व तिच्या अनेक रुपांचे वाहन बनवले आहे. अनेक संस्थानिक तसेच राजकीय पक्षांच्या मानचिन्हांवर वाघ विराजमान आहे. मात्र वाघांचे नैसर्गिक निवासस्थान नष्ट करणे, निवासस्थान खंडीत करणे आणि त्यांची शिकार करण्यामुळे वाघांच्या संख्येवर विपरित परिणाम होत आहे. सध्या भारतात अंदाजे ३१७६ वाघ असून महाराष्ट्रात ४४६ वाघ असल्याचे सांगितले जाते.

वाघ हा एकटा राहणारा प्राणी असून प्रत्येक वाघाच्या अंगावरील पट्टे वेगवेगळे असतात, जसे प्रत्येक माणसाचे ठसे वेगवेगळे असतात. पंजाची ठेवणही वेगळी असते. वाघ पट्टीचे पोहणारे असून आपले क्षेत्र झाडांवर मुत्राचे फवारे मारून अथवा झाडांवर नखांचे ओरखडे मारुन निश्चित करतात. प्रत्येक वाघाचे शिकारी क्षेत्र ६० ते १०० चौ.किमी. असते. वाघ बहुतांशी आपल्या क्षेत्रात इतर नर वाघांना येण्यास मज्जाव करतात. मात्र अनेक वाघीणींना आपल्या क्षेत्रात सामील करून घेतो‌. नर वाघ आपल्या क्षेत्रात आपल्या पिल्लांचेही अतिक्रमण सहन करत नाही. पण काही वेळ नर वाघांनी पित्याची भूमिका देखिल बजावल्याचे आढळते. वाघांच्या तुलनेत वाघीणींचे क्षेत्र कमी म्हणजेच १५ ते २० चौ. किमी. असते.

वाघ अतिउच्च दर्जाचा शिकारी असला तरी त्याला एक शिकार मिळवायला सरासरी वीस प्रयत्न करावे लागतात. माणूस वाघांचे नैसर्गिक भक्ष्य नाही. वाघ शक्यतो माणसांशी संपर्क टाळतो. जो वाघ वारंवार माणसांवर हल्ले करतो, नेहमी भक्ष्य बनवतो त्याला नरभक्षक वाघ म्हणतात. विशेषतः सुंदरबन येथील प्रतिकुल नैसर्गिक परिस्थितीने, खाऱ्या पाण्याने वाघ जास्त आक्रमक होतात. तसेच वृद्धपण, जखमांमुळे, इतर शिकार साधता न आल्याने किंवा काही पुर्वानुभवांमुळे वाघ नरभक्षक होतात. उत्तरेकडील भागात मानवी मृतदेहांना नदीत वाहून देण्याच्या अंत्यसंस्काराच्या प्रथेने वाघांना आयते भक्ष्य मिळाल्याने ते नरभक्षक बनतात असाही एक मतप्रवाह आहे.

व्याघ्र संरक्षण, संवर्धनाला आजच्या घडीला प्राधान्य दिले जात आहे. यांत शिकाऱ्यां विरूद्ध कडक नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. सोबतच व्याघ्र संख्या वाढीच्या दृष्टीने वाघांच्या वसती स्थानातून मनुष्य वस्ती पूर्णपणे हटवून माणुस व वाघ यांतील संघर्ष टाळता येईल. जंगलातील कुरणांचा विकास करून हरीणांच्या व इतर भक्ष्यांच्या संख्येत वाढ करण्यावर भर दिला पाहिजे. घनदाट जंगलांचे क्षेत्रफळ वाढवणे, उन्हाळ्यात उपासमार व पाण्याचा दुर्भिक्षापासून जंगलातील प्राण्यांना वाचवणे, नैसर्गिक पाणवठे संवर्धित करणे, कृत्रिम पाणवठ्यांची सोय करणे तसेच पुरापासून संरक्षणासाठी चौथारे किंवा उंचावरील जागांची निर्मिती करणे याद्वारे व्याघ्र आणि इतर प्राण्यांचे संवर्धन शक्य होऊ शकते. एखाद्या जंगलात क्षमतेपेक्षा जास्त व्याघ्रसंख्या आढळली तर इतर कमी वाघ असलेल्या जंगलात त्यांचे पुनर्वसन करणे आदी बाबी व्याघ्र संरक्षण, संवर्धनास करता येईल.

*गोरेवाडा सफारी वर्णन समाप्त.*

*सर्व आदर्श वाचकांचे मनापासून आभार*

दि. २८ जून २०२३
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles