
आश्वासनातील विकासाचा फोलपणा, अर्थात ‘पोलखोल’; स्वाती मराडे
_गुरूवारीय चित्र चारोळी स्पर्धेचे परीक्षण_
चेह-यावरचा मुखवटा दाखवत असतो वेगळंच काही.. त्याला साथ देत शब्द बोलत असतात… पण डोळे मात्र.. नजर चोरून बोलतात.. नजर न भिडवता बोलतात.. मुखवट्याशी व शब्दांशी वागतच नाहीत ते सुसंगत.. हो ना..डोळे मनातलं काहूर सांगतात तेव्हा होते मनातल्या भावनांची पोलखोल.
घरात काही कळू द्यायचं नाही म्हणून जिवाचा आटापिटा केला. सगळं कसं छान जुळून आलेलं.. कुणाला काहीही कळालं नसतं.. पण त्या छोट्या चिंटूने गोंधळ केला.. शब्दात फसला.. आणि पोलखोल करून बसला.. अन् झाली लपवाछपवीची पोलखोल.
दाल में जरूर कुछ काला है.. असं जेव्हा मनाला वाटतं तेव्हा ते पोलखोल करण्याच्या मागे लागतं. मन अस्वस्थ होतं नक्की काय लपलंय यामागं याचा शोध घेतं. जेव्हा विश्वास होतो डळमळीत व संशयाची सुई टोचू लागते तेव्हा पोलखोल करावी वाटते.
स्टिंग ऑपरेशन करून अनेक गुपितं बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातो. राजकीय, समाजिक क्षेत्रात असे प्रयत्न होतात. अन् एकमेकांची पोलखोल करण्याचा प्रयत्न करतात. पोलखोल कधी स्वतःकडून होते.. कधी इतरांकडून होते. तर कधी निसर्गही करतो.
नेते आश्वासनांची खैरात करून मतदानाची भीक मागतात. निवडून येतात. सत्तेच्या खुर्चीवर बसतात. लोकांना विकासाचं गाजर दाखवलं जातं. विविध कामांच्या निविदा निघतात. मंजूर होतात. निधी येतो. कामे सुरू होतात. पण प्रत्यक्षात कामासाठी पोहचणारा पैसा अनेक चाळण्यांमधून झिरपत खाली येतो. त्यामुळे या गोलमटोल मधून झालेल्या बांधकामांचे, रस्त्यांचे, पुलांचे लवकरच पितळ उघडे पडते. पहिल्याच पावसात नाले तुडुंब भरतात. रस्ते जलमय होतात आणि नालेसफाईची पोलखोल होते. पहिल्याच पावसात पूल वाहून जातो अन् बांधकाम करताना भ्रष्टाचाराचे किती पाणी पुलाखालून वाहून गेले याची साक्ष देतो. बांधकाम सुरू असतानाच एखादी इमारत कोसळते आणि निकृष्ट साहित्यामुळे कच्चा राहिलेला पाया क्षणात ढासळतो. आज चित्र चारोळी स्पर्धेसाठी आलेले चित्र.. पहिल्याच पावसात रस्त्याची दुर्दशा दाखवणारे.. झालेल्या निकृष्ट बांधकामांची पोलखोल करणारे.. सर्वसामान्य जनता काही बोलत नसली तरी नेत्यांच्या आश्वासनातील विकासाचा फोलपणा असा उघड करणारे.
ते रस्तेही तुमच्या आश्वासनांची
पोलखोल करतात.
धो धो पडणा-या पावसासोबत
स्वतःला वाहून नेतात.
जणू काही तेही सांगत असावेत तुम्ही मला टिकून राहण्यालायक बनवलंच नाहीतर मी तरी काय करावं.. तुमच्या शब्दांसारखंच मीही विरून जावं.
चित्रानुरूप भ्रष्टाचार, होणारे गोलमाल, झोल, लाचखोर, या सर्वांचा प्रत्यक्ष कामावर किती परिणाम होतो याचे वास्तवदर्शी लेखन करण्यासाठी आपणा सर्वांची लेखणी सरसावली. कवीमन कल्पनेत रमते तसेच मार्मिक फटकारही ओढते याची अनुभूती आली. सहभागी सर्व रचनाकारांंचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐
आदरणीय राहुल दादांनी मला परीक्षण लेखणीची संंधी दिली त्यांचे हृदयस्थ आभार 🙏
सौ स्वाती मराडे,पुणे
मुख्य परीक्षक सहप्रशासक
मराठीचे शिलेदार समूह